विहिरीत पडलेल्या माकडांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:29 IST2018-05-21T22:29:01+5:302018-05-21T22:29:11+5:30
पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या २२ माकडांना जीवदान देण्यात ग्रामस्थ व वनविभागाच्या पथकाला यश आले. तालुक्याच्या जवळगाव येथे रविवारी दोरीच्या जाळीने माकडांना वाचविण्यात आले.

विहिरीत पडलेल्या माकडांना जीवदान
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या २२ माकडांना जीवदान देण्यात ग्रामस्थ व वनविभागाच्या पथकाला यश आले. तालुक्याच्या जवळगाव येथे रविवारी दोरीच्या जाळीने माकडांना वाचविण्यात आले.
जंगलात पाणी नाही, वन्य जीवांची गावाकडे धाव सुरू आहे. पाण्याच्या शोधात माकडाचा कळप जवळगाव शिवारात शिरला. शिवराज गुघाणे यांच्या शेतात असलेल्या विहिरीत एक-दोन नव्हे तर तब्बल २२ माकडं एकामागून एक कोसळली. त्यांची जिवाच्या आकांताने धडपड सुरू होती.
शेतात गेलेल्या शिवराज गुघाणे यांनी विहिरीत माकडं पडल्याची माहिती गावकऱ्यांना दिली. तेथूनच या माकडांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू झाला. वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर पुंड यांना माहिती दिली. त्यांच्यासह आरती उके, आर.एम. लढी, सविता भडके हे वनअधिकारी व कर्मचारी विनाविलंब जवळगावात दाखल झाले. माकडांना बाहेर काढण्यासाठी दोरीची जाळी विहिरीत टाकली. त्याआधारे सर्व २२ माकडांना वाचविण्यात यश आले.
पाण्याच्या शोधात जवळगाव शिवारात मागील आठ दिवसात जवळपास १५० माकडं विहिरीत पडली. या गावातील बाबाराव चिपडे हे व्यक्ती रोज दोरीची जाळी घेऊन निघतो आणि माकडांचे प्राण वाचवितो. शिवराज गुघाणे, बाबाराव चिपडे, महादेव गुघाणे यांच्याच विहिरीला पाणी आहे. रविवारी या शिवारात असलेल्या विहिरींमध्ये २८ माकडं पडली होती.