पुसद शहरवासीयांची जीवनदायिनी पूस धरणात ४६ टक्केच जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST2019-09-22T06:00:00+5:302019-09-22T06:00:10+5:30
दरम्यान, २०१० ते २0१३ असे सलग चार वर्षे धरण ओव्हरफ्लो झाले होते. २०१४-२०१५ व २०१७ मध्ये धरण ओव्हरफ्लो झालेच नाही. २०१६-२०१८ मध्ये ऑगस्ट महिन्यात धरण ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षी सप्टेंबर महिना संपत आला तरी पूस धरणात केवळ ४६.७० टक्केच जलसाठा आहे.

पुसद शहरवासीयांची जीवनदायिनी पूस धरणात ४६ टक्केच जलसाठा
अखिलेश अग्रवाल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : पावसाळा सुरू होऊन साडे तीन महिने लोटले. आता पाऊस परतीच्या मार्गावर आहे. मात्र शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पूस धरणात केवळ ४६ टक्के पाणीसाठा आहे. परिणामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट बळावणार आहे.
पूस प्रकल्पाच्या जलसाठ्यात सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात वाढ झाली नाही. मागील वर्षी ऑगस्टमध्येच धरण ओव्हरफ्लो झाले होते. यंदा धरणात केवळ ४६.७० टक्के पाणी आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. येथून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर वनवार्ला येथे ‘वसंत सागर’ म्हणजे पूस धरण आहे. हे धरण पुसदकरांसाठी जीवनदायीनी आहे. मागील १८ वर्षांची आकडेवारी बघितली तर सातदा धरण ओव्हर फ्लो झालेच नाही.
दरम्यान, २०१० ते २0१३ असे सलग चार वर्षे धरण ओव्हरफ्लो झाले होते. २०१४-२०१५ व २०१७ मध्ये धरण ओव्हरफ्लो झालेच नाही. २०१६-२०१८ मध्ये ऑगस्ट महिन्यात धरण ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षी सप्टेंबर महिना संपत आला तरी पूस धरणात केवळ ४६.७० टक्केच जलसाठा आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगाम बहरला, तरी उन्हाळ्यात पुसदकरांना दुष्काळाचे चटके तर बसणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला.
गेल्यावर्षी पूस धरणासह गाव तलाव, शेततळे, वनतळे, विहिरी, विंधन विहिरी व अन्य स्त्रोत तुडूंब भरले होते. यावर्षी पिकांना संजीवनी देणारा पाऊस पडला. खरीप हंगाम चांगला आहे. मात्र अद्याप पावसाने दमदार हजेरी लावली नाही. पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले आहे. खरीप पिके चांगली आहे. मात्र रब्बीच्या पिकांचे काय, असा प्रश्न आहे. पूस धरणाच्या खोऱ्यात दमदार पाऊस झाला की प्रकल्पाचा जलस्तर झपाट्याने वाढतो. मात्र यंदा नदी पात्राच्या खोऱ्यात चांगला पाऊस झाला नाही.
वारा धरण झाले ‘ओव्हरफ्लो’
पूस धरणाचा जलसाठा सप्टेंबर महिन्यात थोडा फार वाढला. २१ सप्टेंबरला ४६.७० टक्के जलसाठा आहे. पूस धरणाच्या वरील वारा धरण २० ऑगस्टलाच ओव्हर फ्लो झाल्याने आता पूस धरणाचा जलसाठा निश्चित झपाट्याने वाढेल, अशी माहिती पालिकेचे पाणी पुरवठा सभापती राजू दुधे यांनी दिली.