ऐका होऽ ऐकाऽऽ.. पोरांना रोज टीव्ही पाहायला सांगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:00:49+5:30

ऑनलाईन शिक्षणात अडचणी येत असल्याने शासनातर्फे सोमवारपासून टीव्हीवर प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. त्यासाठी ‘टिलीमिली’ ही खास मालिका सुरू होत आहे. त्याबाबत पोरांना जागृत करण्यासाठी ग्रामपंचायतीने असा पुढाकार घेत गावात चक्क फलकही लावले आहे.

Listen, listen .. Tell the kids to watch TV every day! | ऐका होऽ ऐकाऽऽ.. पोरांना रोज टीव्ही पाहायला सांगा!

ऐका होऽ ऐकाऽऽ.. पोरांना रोज टीव्ही पाहायला सांगा!

ठळक मुद्देसंडे अँकर । ‘टिलीमिली’साठी ग्रामपंचायतीची दवंडी, गावात फलक, मंदिरातून घोषणा, घरोघरी पत्रके, सोमवारपासून

टीव्हीवर शाळा
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘ऐका होऽ ऐकाऽऽ आता दररोज टीव्हीवरून शाळा भरणार आहे. आईबाबांनो, पोरांना रोज टीव्ही पाहायला सांगा...’ अशी दवंडी शनिवारपासून चोंदी ग्रामपंचायतीने सुरू केली आहे. खेड्यापाड्यातील पोरांना ऑनलाईन शिक्षणात अडचणी येत असल्याने शासनातर्फे सोमवारपासून टीव्हीवर प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. त्यासाठी ‘टिलीमिली’ ही खास मालिका सुरू होत आहे. त्याबाबत पोरांना जागृत करण्यासाठी ग्रामपंचायतीने असा पुढाकार घेत गावात चक्क फलकही लावले आहे.
शासनाच्या सह्याद्री वाहिनीवरून ‘टिलीमिली’ मालिकेतून रोज प्रत्येक वर्गाच्या मुलांना शिकविले जाणार आहे. त्याविषयी प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती व्हावी म्हणून शिक्षक चंद्रबोधी घायवटे यांनी फलक तयार केला, तो ग्रामपंचायतीने गावात लावला. मग सरपंच त्र्यंबकराव उईके आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उज्ज्वलाताई देवाडे व इतर सदस्यांना बोलावून वर्दळीच्या ठिकाणी हा फलक लावण्यात आला. गावातील जनार्दन आत्राम या युवकाने स्वयंस्फूर्तीने घरा-घरात जावून छापील पत्रके वाटली. या टीव्ही वर्गाचे मुलांना सातत्याने स्मरण होत राहावे यासाठी पुढे दीड महिना गावात दवंडी दिली जाणार आहे. त्यासाठी सीमाताई प्रशांत जांभूळकर मंदिरातून ध्वनिक्षेपकाद्वारे घोषणा करणार आहेत.

शिक्षक म्हणतात, ‘मै हूं ना’
टिलीमिली या शैक्षणिक टीव्ही मालिकेचे वर्गनिहाय वेळापत्रक फलकावर लिहून तो फलक सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आला. दिलेल्या वेळेवर संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गाचा अभ्यास टीव्हीवर पाहण्याचे आवाहन करण्यात आले. खेड्यात टीव्ही पाहण्यात, चॅनल शोधण्यात अडचण आलीच तर गुरुजींनी फलकावर लिहिले, ‘मै हूं ना... बिनधोक फोन करा !’

‘कॉर्नर स्कूल’लाही यश
चोंदी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असले तरी शिक्षक मात्र एकच आहे. ऑनलाईन शिक्षण कसे द्यावे, हाही प्रश्नच आहे. कारण दोनच पालकांकडे अ‍ॅन्ड्रॉईड फोन. तेही पालकांसोबत शेतावर. शेवटी शिक्षक चंद्रबोधी घायवटे यांनी ‘कॉर्नर स्कूल’ची शक्कल शोधली. दोन-चार मुलं जिथं खेळतात, त्याच ठिकाणाला शिकण्याचे केंद्र बनवले. शेजारी राहणारे व सोबत खेळणारे अशा चार-पाच विद्यार्थ्यांचे गट तयार केले. येथे सोशल डिस्टन्स पाळत अनौपचारिक शिक्षण देण्याची जबाबदारी गावातील शिक्षणप्रेमींवर सोपविली. गाणी, गप्पा, गोष्टी, खेळ या माध्यमातून शिकवणे सुरू झाले. आठवड्यातून एकदा शिक्षक स्वत: भेट देतात.

Web Title: Listen, listen .. Tell the kids to watch TV every day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा