रोहयोला ‘आधार’चे लिंकेज
By Admin | Updated: November 11, 2014 22:47 IST2014-11-11T22:47:00+5:302014-11-11T22:47:00+5:30
रोजगार हमी योजनेला लागलेली भ्रष्टाचाराची वाळवी काढण्याचा खटाटोप प्रशासनाकडून केला जात आहे. सुरुवातीला कागदोपत्री होणारे कामकाज आता आॅनलाईन करण्यात आले आहे.

रोहयोला ‘आधार’चे लिंकेज
गैरप्रकाराला आळा : ५६ हजार मजुरांच्या बँक खात्यासह एमआयएस कनेक्टेड
यवतमाळ : रोजगार हमी योजनेला लागलेली भ्रष्टाचाराची वाळवी काढण्याचा खटाटोप प्रशासनाकडून केला जात आहे. सुरुवातीला कागदोपत्री होणारे कामकाज आता आॅनलाईन करण्यात आले आहे. त्यासाठी एमआयएस (मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टीम) स्वतंत्र संगणक प्रणालीही विकसित केली. आता या एमआयएसला आधार कार्ड लिंकेज करून प्रत्यक्ष राबणाऱ्या मजुरांच्या हाताला काम दिले जाणार आहे.
जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून मिळणाऱ्या कामासाठी आठ लाख ३४ हजार मजुरांनी नोंदणी केली आहे. त्यांना कामासाठी जॉब कार्डही वितरित करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र यातील एक लाख ३० हजार मजूरच सक्रिय असल्याचे आढळून आले आहे. बरेचदा बोगस जॉब कार्डचा वापर करून कंत्राटदारांकडूनच रोहयोच्या निधीचा मलिदा लाटल्याचे उघड झाले आहे. कोट्यवधी रुपयांची तरतूद असलेली ही योजना अधिकारी आणि कंत्राटदारांनी आपले कुरण बनविली होती. अनेकजण रोहयोतील पळवाटांमुळे काम न करताच आर्थिकदृष्ट्या गलेलठ्ठ झाले आहे. या योजनेतील भ्रष्टाचार पूर्णत: संपुष्टात आणण्यासाठी शासनस्तरावरूनच सातत्याने नवनवीन प्रयोग केले जात आहे. एमआयएसमुळे रोहयोचे संपूर्ण कामकाज आॅनलाईन झाले. शिवाय मजुरांचे जॉब कार्डही आॅनलाईनच भरण्यात येवू लागले. प्रत्यक्ष कामावर असलेल्या मजुरांचा फोटो आणि त्याचे बँक अथवा पोस्टात असलेल्या खात्यांचा क्रमांक याची नोंद करण्यात आली. यातही काही अंशी त्रुट्या असल्याने आता आधारकार्ड द्वारे ही बँक खाती जोडली जाणार आहे. तसेच एमआयएसशीसुद्धा आधार कार्डचे लिंकेज केले जाणार आहे. आतापर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाने पंचायत समितीस्तरावरून ५६ हजार ५३१ मजुरांचे बँक खाते आणि एमआयएस याच्याशी आधार कनेक्टेड केले आहे. या उपाययोजनांमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी आशा आहे. (कार्यालय प्रतिनिधी)