पत्नीला जाळणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा
By Admin | Updated: January 7, 2015 22:59 IST2015-01-07T22:59:30+5:302015-01-07T22:59:30+5:30
साक्षीदार फितूर झाल्याने मृत्यूपूर्व बयाण ग्राह्य धरून दोष सिद्ध झाल्याने पत्नीला पेटवून ठार मारणाऱ्या आरोपीला जन्मठेप आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

पत्नीला जाळणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा
यवतमाळ : साक्षीदार फितूर झाल्याने मृत्यूपूर्व बयाण ग्राह्य धरून दोष सिद्ध झाल्याने पत्नीला पेटवून ठार मारणाऱ्या आरोपीला जन्मठेप आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्याचा निकाल येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी. बारणे यांच्या न्यायालयाने बुधवारी दिला.
सखाराम शिवलाल राठोड (४२) रा. साखरा असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. तर निर्मला सखाराम राठोड (३८) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सखाराम हा माहेरावरून २० हजार रुपये आणण्यासाठी पत्नी निर्मलाच्या मागे तगादा लावायचा. त्यातूनच मद्यधुंदीत तिला बेदम मारहाण करायचा. १९ जून २०१२ ला रात्री ८.३० वाजता तो नेहमीप्रमाणे दारु पिऊन घरी आला. यावेळी त्याने पैशासाठी निर्मलाच्या मागे तगादा लावला. नकार देताच संतप्त झालेल्या सखारामने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यामध्ये निर्मला ही ९० टक्के एवढी गंभीररित्या जळाली होती. येथील शासकीय रुग्णालयात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तत्पूर्वी एएसआय अनिल साने यांनी तिची मृत्यूपूर्व जबाणी घेतली होती. त्यामध्ये पती सखाराम याने पेटवून दिल्याचे तिने सांगितले.
मृत्यूपूर्व जबाणीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी सखाराम याच्याविरुद्ध झिरोवर खुनाचा गुन्हा नोंदविला. तसेच प्रकरण तपासासाठी घाटंजी पोलिसांकडे वर्ग केले. त्यांनी सखारामला अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. हा खटला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी. बारणे यांच्या न्यायालयापुढे चालला. त्यामध्ये एकूण १३ साक्षी तपासण्यात आल्या. त्यातील घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि अन्य असे एकूण सहा साक्षीदार फितूर झाले. मात्र न्यायालयाने निर्मलाची मृत्यूपूर्व जबाणी ग्राह्य धरून आरोपी सखारामला शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्यावतीने सहायक सरकारी वकील अॅड़ नरेंद्र मेश्राम यांनी युक्तीवाद केला. (स्थानिक प्रतिनिधी)