पोटनिवडणुकीकडे सर्वांची पाठ
By Admin | Updated: April 8, 2015 23:59 IST2015-04-08T23:59:10+5:302015-04-08T23:59:10+5:30
तालुक्यातील ४० ग्रामपंचायती व २३ गावांमधील ४१ प्रभागांची पोटनिवडणूक २२ एप्रिलला होत आहे.

पोटनिवडणुकीकडे सर्वांची पाठ
४० ग्रामपंचायतींची निवडणूक : ८६३ उमेदवारांचे अर्ज, ५७ जागेसाठी एक महिला
वणी : तालुक्यातील ४० ग्रामपंचायती व २३ गावांमधील ४१ प्रभागांची पोटनिवडणूक २२ एप्रिलला होत आहे. त्यासाठी ८६३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मात्र पोटनिवडणुकीच्या ४१ प्रभागासाठी केवळ एकाच महिलेचा अर्ज प्राप्त झाल्याने पोटनिवडणुका पुन्हा स्थगित होण्याची चिन्हे आहेत.
मंगळवारी नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी येथील महसूल भवनात एकच झुुंबड केली होती. त्यामुळे निवडणूक विभागाला अर्ज दाखल करून घेण्यास सायंकाळी ७ वाजतापर्यंत कार्य करावे लागले. ४० ग्रामपंचायतींच्या १२३ प्रभागासाठी ही निवडणूक होत आहे. त्यासाठी तब्बल ८६३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात ४५१ पुरूष, तर ४१२ महिलांच्या अर्जाचा समावेश आहे. यामध्ये अनेक ग्रामपंचायतींमध्ये जागेएवढेच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध होणार आहेत. मात्र हे चित्र बुधवारी छाननीनंतर स्पष्ट होणार आहे.
आज बुधवारी सायंकाळी उशीरापर्यंत अर्जांची छाननी प्रकिया सुरूच होती. यासोभतच तालुक्यातील २३ गावांमधील ४१ प्रभागांतील ५७ जागांकरिता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्जच भरले नाही. केवळ एका महिलेचा अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे सर्वच पोटनिवडणूका स्थगित होणार आहे. अशा ग्रामपंचायतींची मुदत सहा महिन्यानंतर भरणार आहे. त्यामुळे केवळ सहा महिन्यांचे शिलेदार बनण्यास गावात कोणीही उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. ९ व १० एप्रिलला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. १० एप्रिलला ३ वाजतानंतर चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. ग्रामीण भागातील वातावरण सध्या निवडणूक ज्वराने तापलेले आहे. गटा-तटाचे राजकारण जोर पडकत आहे. सर्वच पक्षांचे पुढारीही ग्रामपंचायती आपल्या ताब्यात कशा येतील, यासाठी गावात बैठका घेऊन मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात वातावरण तापले आहे. पारावरच्या बैठकांना ऊत आला आहे. गावोगावी गावपुढारी रणनितीत व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
नांदेपेरा पोटनिवडणुकीवर विरजण
नांदेपेरा : येथील काही ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिल्याने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. मात्र पोटनिवडणुकीसाठी ग्रामस्थांनी अर्जच दाखल केले नाही. त्यामुळे पोटनिवडणुकीवर विरजण पडले आहे.
नांदेपेरा ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकाळ येत्या मे-जून महिन्यापर्यंत आहे. सार्वत्रिक निवडणुकीला केवळ दोन ते चार महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत विजयी उमेदवारांना केवळ दोन-तीन महिन्यांचाच कार्यकाळ मिळणार होता. त्यानंतर आॅगस्ट महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. परिणामी ग्रामस्थांनी दोन महिन्याकरिता उमेदवारी दाखल करण्यापेक्षा येत्या सार्वत्रिक निवडणुकीतच उमेदवारी दाखल करावी, या उद्देशाने कोणत्याही ग्रामस्थाने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखलच केले नाही.
येत्या आॅगस्ट महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होणार असून येथील सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे गावातील दिग्गज गावपुढाऱ्यांचे गणितच बिघडले आहे. महिला आरक्षण जाहीर होण्यापूर्वी काही गावपुढारी सरपंच मीच होणार, अशी भूमिका घेऊन चर्चेचे पेव फोडत होते. मात्र आता सरपंचपद महिलेसाठी आरक्षित झाल्याने त्यांची चांगलीच नाचक्की झाली आहे. यापूर्वीही सरपंच महिलाच होती. आता पुन्हा महिलाच सरपंच होणार असल्याने पुरूषांची झोपमोड झाली आहे. या ग्रापंचायतीमध्ये नऊ सदस्यांपैकी पाच सदस्य महिला असणार आहे. त्यामुळे गावात महिला राज येणार आहे. (वार्ताहर)
पांढरकवडा : उन्हातही उत्साह कायम
पांढरकवडा : तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ६२७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे तापत्या उन्हातही निवडणूक उत्साह दिसून येत आहे. नेते, कार्यकर्ते, महिला व यवुक यांचे जथ्थे अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. मंगळवारी कुणी आॅटोने, कुणी मोटारीने, कुणी बसने तहसील कार्यालयात पोहोचले होते. महिला आरक्षणामुळे महिलासुद्धा मुलाबाळांसह अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. युवकांनी ढोल-ताशाच्या गजरात मित्रमंडळीसह अर्ज दाखल केले. तालुक्यातील काही ग्रामपंचायती अविरोध होण्यासाठी नेते मंडळी आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन तालुक्यातील काही ग्रामपंचायती अविरोध होण्याच्या मार्गावर आहे. (शहर प्रतिनिधी)
झरी तालुक्यात २९ ठिकाणी निवडणूक
मुकुटबन : झरीजामणी तालुक्यात ५६ ग्रामपंचायतींपैकी २९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यात अनुसूचित जातीकरिता येडशी व पाटण ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित असून अडेगाव, येडद, मुकुटबन, अहेरअल्ली, टाकळी येदलापूर, खडकी आणि अर्धवन या ग्रामपंचायतींचे सरपंचपद नागरिकांच्या मागांस प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. लिंगटी, दरा, हिरापूर, सुर्दापूर, दुर्भा, वठोली, बोपापूर, भेंडाळा, पिंप्रड, खातेरा, दिग्रस, मांगली, कमळवेल्ली, धानोरा, कोसारा, पिवरडोल आणि राजूर येथील सरपंच पद सर्वसाधारण गटाकरिता आहे. पांढरकवडा (लहान), सतपल्ली, सिंधीवाढोणा येथील सरपंद पद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.
यातील काही गावातील सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झाल्याने तेथील प्रस्थापित गावपुढाऱ्यांना हादरा बसला आहे. त्यांना सरपंच पदावासून वंचित राहावे लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)