बिबट्याने पाडला वासराचा फडशा, ट्रॅप कॅमेरामध्ये कैद
By अविनाश साबापुरे | Updated: June 15, 2023 15:56 IST2023-06-15T15:55:30+5:302023-06-15T15:56:54+5:30
वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी

बिबट्याने पाडला वासराचा फडशा, ट्रॅप कॅमेरामध्ये कैद
बिटरगाव (यवतमाळ) : उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यात बिबट्यांची संख्या वाढलेली आहे. अभयारण्याच्या परिसरातील गावांमध्ये हे वन्यप्राणी गेल्या काही दिवसांपासून हैदोस घालत आहेत. त्यातच बुधवारी रात्री शेतात बांधलेला गोऱ्हा ओढत नेऊन बिबट्याने त्याचा फडशा पाडला. त्याची ही शिकार वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
ही घटना थेरडी गावात घडली. थेरडी येथील शेतकरी परमेश्वर नागोराव उघडे यांनी आपली जनावरे नेहमीप्रमाणे शेतात बांधली होती. त्यावेळी बिबट्याने एक गोऱ्हा ठार मारून त्याला ओढत जंगलापर्यंत नेले. हे संपूर्ण दृश्य वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरात कैद झाले. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच बिबट्याने याच गावातील आणखी एका शेतकऱ्याचा बैल ठार मारला. या परिसरातील गावांमध्ये वन्यप्राणी धुमाकूळ घालत असल्याची वारंवार ओरड होत असूनही वनविभागाकडून दखल घेतली जात नाही. अखेर बुधवारी रात्री एका गोऱ्ह्याची शिकार करताना बिबट कॅमेरामध्ये कैद झाला. त्यामुळे आतातरी वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.