अल्पवयीन गरोदर प्रेयसीला सोडून प्रियकर पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 15:12 IST2021-05-15T15:12:10+5:302021-05-15T15:12:36+5:30
Yawatmal news मारेगाव शहरातील अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बाहेरगावी पळवून नेले. पाच महिने एकत्र राहिले आणि अल्पवयीन मुलगी गरोदर राहताच, प्रियकराने पळ काढल्याची घटना घडली.

अल्पवयीन गरोदर प्रेयसीला सोडून प्रियकर पसार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मारेगाव शहरातील अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बाहेरगावी पळवून नेले. पाच महिने एकत्र राहिले आणि अल्पवयीन मुलगी गरोदर राहताच, प्रियकराने पळ काढल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून प्रियकराविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रियकराच्या शोधात पोलीस पथक रवाना झाले आहे.
संतोष दत्तू चौघुले (२७) असे आरोपीचे नाव असून तो मारेगाव येथील रहिवासी आहे. त्याने शहरातीलच एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवित डिसेंबर महिन्यात पळवून नेले होते. त्यावेळेस पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि ३६३ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला. परंतु आरोपी व मुलीचा शोध लागला नाही. दरम्यान, हे जोडपे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात मोलमजुरी करून पाच महिने एकत्र राहिले, परंतु पाच महिन्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागल्याने अल्पवयीन पीडित मुलगी आईकडे मारेगावला परत आली.
पीडितेने प्रियकराच्या विरोधात पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, ती गरोदर असल्याचे आढळून आले. त्यामुळे याप्रकरणी आरोपी संतोष दत्तू चौघुले याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रियकर आरोपी फरार झाला असून आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी करीत आहेत.