पाच कृषी केंद्रांवर अखेर गुन्हे दाखल, या कंपन्यांची कीटकनाशके सापडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:01 IST2017-10-08T01:01:23+5:302017-10-08T01:01:35+5:30
पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन २० शेतक-यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना कीटकनाशक विक्री करणा-या जिल्ह्यातील पाच कृषी केंद्रांवर शनिवारी गुन्हे नोंदविण्यात आले.

पाच कृषी केंद्रांवर अखेर गुन्हे दाखल, या कंपन्यांची कीटकनाशके सापडली
यवतमाळ : पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन २० शेतक-यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना कीटकनाशक विक्री करणा-या जिल्ह्यातील पाच कृषी केंद्रांवर शनिवारी गुन्हे नोंदविण्यात आले.
कृषी प्रगती या दुकान, गोदाम तसेच साठा पुस्तकाची ५ आॅक्टोबर रोजी तपासणी केली असता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा परवाना न घेता कीटकनाशक विक्री सुरू असल्याचे आढळले. तेथून १३ लाख रुपयांचा साठा जप्त केला. तर, कृषी वैभव या दुकानाच्या तपासणीनंतर विनापरवाना कीटकनाशकाचा साडेचार लाखांचा माल जप्त केला. त्यानुसार दिलीप बोगावार व दिलीप चिंतावार यांच्यावर वडगाव रोड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
कळंब तालुक्यातील सावरगाव येथेही संजय राजा यांच्या जलाराम कृषी केंद्रावर विनापरवाना कीटकनाशक विक्रीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. दारव्हा येथील भेलोंडे एजंसीच्या प्रवीण भेलोंडे यांच्यावर दारव्हा पोलिसात तर अंकिता अॅग्रो एजंसीचे प्रीतम राठी यांच्यावर लाडखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
‘पोलीस तपास करा’
राज्याचे अपर मुख्य सचिव (गृह) सुधीरकुमार श्रीवास्तव हे शनिवारी सकाळीच यवतमाळात दाखल झाले. त्यांनी कृषी, आरोग्य व प्रशासनातील अधिका-यांची बैठक घेऊन आढावा घेतला. या सर्व प्रकरणांचा ‘विषप्राशन’प्रमाणे सखोल पोलीस तपास करा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
तपासणीत रॅलीज इंडिया लि., घरडा केमिकल्स मुंबई, इंडोसीस केमिकल्स, युनायटेड पेस्टीसाईड लि. गुजरात, एस.डी.एस. रामसाईड, अदामा इंडिया, बीएएसएफ, इंडिया पेस्टीसाईड लि. लखनऊ या कंपन्यांची कीटकनाशके आढळली असून, त्यांची विनापरवाना विक्री सुरू होती.
फवारणीचे जिल्ह्यात २० मृत्यू असून, ४०३ विषबाधितांची नोंद आहे. त्यामुळे कृषी केंद्रांविरुद्ध मोहीम सुरू आहे.