‘एमआयडीसी’मध्ये भूखंड वितरण प्रक्रिया तूर्त बंद
By Admin | Updated: November 4, 2016 02:07 IST2016-11-04T02:07:33+5:302016-11-04T02:07:33+5:30
जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत असलेल्या औद्योगिक वसाहतींमधील भूखंडांसाठी आवेदन स्वीकारण्याची प्रक्रिया तूर्तास बंद करण्यात आली आहे.

‘एमआयडीसी’मध्ये भूखंड वितरण प्रक्रिया तूर्त बंद
इच्छुकांचा हिरमोड : सुविधांचा अभाव, केवळ दहा एमआयडीसी क्रियाशील
यवतमाळ : जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत असलेल्या औद्योगिक वसाहतींमधील भूखंडांसाठी आवेदन स्वीकारण्याची प्रक्रिया तूर्तास बंद करण्यात आली आहे. यामागे सोयी-सुविधांचा अभाव हे मुख्य कारण आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला असून त्यांना आवेदनसुद्धा करता येणार नाही. जवळपास एक वर्ष ही परिस्थिती कायम राहील.
शासनाच्या नवीन धोरणानुसार उद्योगांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. औद्योगिक परिसरात आवश्यक त्या सोयी-सुविधांसह, आॅनलाईन आवेदन आणि विविध परवानग्यांची संख्या कमी करण्यावर भर आहे. जेणेकरून उद्योग-व्यवसायाला चालना मिळून स्थानिक बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध होऊ शकेल. यासाठी एमआयडीसी परिसरात भूखंड उपलब्ध करून देण्यात येत आहे. नवीन एमआयडीसी सुरू करण्यावरही जोर आहे. तसेच ज्यांनी एमआयडीसीत भूखंड घेतला आणि नियमानुसार ठराविक कालावधीत तेथे उद्योग थाटला नाही, अशा लोकांचे भूखंड परत घेऊन ते पुन्हा वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात उद्योगाविना असलेले ५६ भूखंड एमआयडीसीने जप्त केले आहे. सध्या जिल्ह्यातील विविध एमआयडीसींमध्ये भूखंड आहेत. परंतु आवश्यक त्या सोयी-सुविधा म्हणजेच रस्ते, वीज व पाणी नसल्याने तूर्तास भूखंड वितरण आणि त्यासाठीचे अर्ज स्वीकारणे एमआयडीसी कार्यालयाने बंद केले आहे. केवळ पुसद येथे सर्व सुविधा असलेले काही भूखंड आहेत. त्यामुळे पुसदसाठी १८ नोव्हेंबरपर्यंत आवेदन स्वीकारले गेले. या आवेदनावर योग्य प्रक्रिया पार पाडल्यानंतर पुन्हा दोन-तीन महिन्यांनी पुसद एमआयडीसीसाठी आवेदन स्वीकारले जाऊ शकते. जिल्ह्यातील यवतमाळसह इतर औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योग थाटण्याची महत्वाकांक्षा बाळगून असणाऱ्यांना नवीन भूखंडासाठी आवेदन करण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. साधारणत: एक वर्षांनी उपलब्ध भूखंडांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होईल. (प्रतिनिधी)
तीन नवीन एमआयडीसी प्रस्तावित
यवतमाळ जिल्ह्यात सध्या तेरा ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. त्यातील दहाच एमआयडीसी क्रियाशील असून इतर ठिकाणी केवळ फलक लागले आहेत. आता पुन्हा तीन नवीन औद्योगिक वसाहती प्रस्तावित आहेत. यामध्ये पांढरकवडा, नेर आणि आर्णीचा समावेश आहे. या तिन्ही एमआयडीसी सुरू होण्याबाबत वेगाने प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच या ठिकाणी त्या सुरू होतील. केवळ एमआयडीसी होऊन भागणार नाही, तर त्या ठिकाणी मोठे उद्योग सुरू होणे आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या-त्या परिसरातील विकास शक्य आहे.