अधिकारी देणार ज्ञानाचे धडे
By Admin | Updated: July 1, 2014 01:43 IST2014-07-01T01:43:46+5:302014-07-01T01:43:46+5:30
नुकत्याच पार पडलेल्या उजळणी सर्वेक्षणात जिल्ह्यातील दोन हजार १०६ शाळांपैकी १८६६ शाळांचा शैक्षणिक दर्जा घसरल्याचे पुढे आले. यावर मात करण्यासाठी अधिकारी शाळेत ज्ञानाचे धडे देणार आहेत.

अधिकारी देणार ज्ञानाचे धडे
रूपेश उत्तरवार - यवतमाळ
नुकत्याच पार पडलेल्या उजळणी सर्वेक्षणात जिल्ह्यातील दोन हजार १०६ शाळांपैकी १८६६ शाळांचा शैक्षणिक दर्जा घसरल्याचे पुढे आले. यावर मात करण्यासाठी अधिकारी शाळेत ज्ञानाचे धडे देणार आहेत. खुद्द जिल्हाधिकारी अशा शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना बाराखडी शिकविणार आहेत. गुणवत्ता वाढीसाठी ते एक दिवस शाळेत घालविणार आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग यवतमाळात राबविला जात आहे.
जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयोग शासनाने हाती घेतला आहे. शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी निकाल आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये अ, ब, क, ड, ई अशा प्रकारामध्ये शाळांची विभागणी करण्यात आली आहे.
अ आणि ब श्रेणीतील शाळांची प्रगती चांगली आहे. तर क, ड आणि ई गटात मोडणाऱ्या शाळांची प्रगती खालावली आहे. यावर मात करण्यासाठी गुणवत्ता सुधार प्रयोग हाती घेण्यात आला आहे. त्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे.
यात खाते प्रमुखाला शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या अधिकाऱ्याकडे शाळा दत्तक देण्यात आली त्यांनी वर्षभर त्या शाळेवर नियंत्रण ठेवायचे आहे. दर महिन्यातला एक दिवस शाळेत घालवायचा आहे. विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेण्यापासून शाळेच्या दुरूस्तीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना लोकसहभागातून करावयच्या आहे. विद्यार्थ्यांच्या तासिका आणि शिकविण्याच्या पध्दतीतील बारकावे जाणून घेतले जाणार आहे.
खाते प्रमुखाकडे शाळा दत्तक दिल्याने शाळेत दुरूस्तीच्या बाबतीत होणारी हयगय आणि गुणवत्तेकडे झालेले दुर्लक्ष टाळण्यास मोलाची मदत होणार आहे. नव्या संकल्पना पुढे येतील यातून शाळेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.
शाळा दत्तक देतांना जिल्हाधिकारी ते प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांपर्यंत संपूर्ण नियोजन जिल्हा परिषदेने तयार केले आहे. २६ जूनपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
अशा आहेत अधिकाऱ्यांच्या शाळा
जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याकडे नेर तालुक्यातील कोलुरा येथील शाळा सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दर महिन्याला या शाळेत संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. उणिवा जाणून घेणार आहेत. पोेलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे कळंब तालुक्यातील बेलोना शाळा सोपविण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक २६ जून रोजी या शाळेत पहिल्या ठोक्याला हजर राहिले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे बाभूळगाव तालुक्यातील दिघीची शाळा दत्तक आहे. तर डायटचे प्राचार्य डॉ. रवींद्र आंबेकर यांच्याकडे बाभूळगाव तालुक्यातील मालापूरची शाळा दत्तक आहे.