यवतमाळ जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे गावेच्या गावे झाली किडनीरुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 11:02 IST2018-03-15T11:01:32+5:302018-03-15T11:02:09+5:30
फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे शंभराहून अधिक बळी गेलेले असताना यंदा तीव्र टंचाईत भूगर्भातील दूषित पाणी पिल्याने गावेच्या गावे किडनी रुग्ण बनले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे गावेच्या गावे झाली किडनीरुग्ण
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नापिकी, फवारणीतील विषबाधा या कारणांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मरण गाजले. आता याच जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर पाणी पिल्याने मरत आहेत. फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे शंभराहून अधिक बळी गेलेले असताना यंदा तीव्र टंचाईत भूगर्भातील दूषित पाणी पिल्याने गावेच्या गावे किडनी रुग्ण बनले आहेत. येथून दररोज ५० रुग्ण केवळ डायलिसीससाठी अमरावतीला जात आहेत. तर तेवढेच रुग्ण तपासणीसाठी धाव घेत आहेत.
जिल्ह्यातील ४५२ गावांमधील पाण्याचे स्त्रोत फ्लोराईडयुक्त असल्याची शासकीय आकडेवारी आहे. प्रत्यक्षात हजारो गावे दूषित पाणी पिउन जगत आहेत आणि हळूहळू किडनी खराब होऊन मरणाकडे वाटचाल करीत आहेत. एकेका कुटुंबात किडनीचे तीन-तीन रुग्ण आढळत आहेत. उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. जमिनीच्या पोटात खोल-खोल विंधनविहिरी खोदून पाणी उपसले जात आहे. जेवढ्या खोलातून पाणी काढले, ते तेवढेच जास्त दूषित. त्यातूनच यवतमाळसह घाटंजी, पांढरकवडा, झरीजामणी, उमरखेड, दिग्रस, नेर, दारव्हा या तालुक्यांमधील खेड्यांत सध्या किडनीच्या रुग्णांचे प्रमाण दरदिवशी वाढत आहे. वसंतनगर, चोपण, मारेगाव, खैरगाव, आंबेझरी, आमडी, जरंग, साखरा, मुरली आदी खेड्यांमध्ये गंभीर स्थिती आहे. आसोला गावात तर किडनीच्या आजाराने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुरली गावात गेल्या दहा वर्षात ५० जण दगावल्याचे सांगितले जाते.
बंदी असलेली गोळी किराणा दुकानात
दूषित पाण्याने किडनीचे रुग्ण वाढत असताना यवतमाळात डायलिसीसची सुविधाच नाही. ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजूरच दूषित पाण्याचे बळी ठरत आहेत. त्यामुळे शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने नुकतेच अमरावती येथील किडनी विकार तज्ज्ञ डॉ. अविनाश चौधरी यांचे शिबिर आसोला गावात घेतले. त्यावेळी डॉ. चौधरी म्हणाले, माझ्या ओपीडीमध्ये दररोज यवतमाळ जिल्ह्यातून रुग्ण येत आहेत.
५० जण तर डायलिसीससाठीच येत आहेत. रोज बोलेरो गाडी भरून रुग्ण येत आहेत. विशेष म्हणजे, शेतमजूर चक्क किरणा दुकानातून पेन किलर म्हणून निमोसुलाईड गोळी घेऊन खाताना आढळले. ही गोळी किडनीवर मारा करते. बंदी असलेली ही गोळी किराणा दुकानातून कशी मिळते, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
‘नीरी’ने तपासावे पाणी
ज्या भागातील पाणीस्त्रोतांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण जास्त आहे तेथील पाण्याची तपासणी वर्षातून किमान दोन वेळा व्हायला पाहिजे. शेकडो खेड्यातील पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, स्टोरियम, आयरन, कार्बोनेट, सल्फेट यांचे प्रमाण जास्त आढळते. अशा ‘हार्ड वॉटर’ची तपासणी ‘नीरी’सारख्या संस्थेमार्फत होणे आवश्यक आहे. अधिक क्षारयुक्त पाणी हे किडनी आजाराचे मूळ कारण आहे. तणनाशकातील ग्लायफासेट हे रसायन थेट जमिनीत जाऊन नंतर पाणी व खाद्यस्त्रोतांमध्ये मिसळले जातात. त्यामुळेही या आजाराची शक्यता वाढते. वारंवार लघवी येणे, कंबर दुखणे, मीठ खावेसे वाटणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत.