करंजी ग्रामीण रुग्णालयाला समस्यांचा कॅन्सर; रुग्णांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 14:51 IST2022-02-07T14:42:22+5:302022-02-07T14:51:20+5:30

२००६ मध्ये करंजी येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. सर्व सोयींनी युक्त असलेले हे ग्रामीण रुग्णालय करंजी येथे सुरू झाल्यामुळे परिसरातील २५ ते ३० गावांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले; परंतु हे समाधान फार काळ टिकले नाही.

karanja rural hospital condition is deplorable and the health system has completely collapsed | करंजी ग्रामीण रुग्णालयाला समस्यांचा कॅन्सर; रुग्णांची हेळसांड

करंजी ग्रामीण रुग्णालयाला समस्यांचा कॅन्सर; रुग्णांची हेळसांड

ठळक मुद्देएक्स-रे मशीन आहे; पण तंत्रज्ञ नाही रक्त तपासणी मशीन बंद, रेफरचे प्रमाण वाढले

नरेश मानकर

पांढरकवडा (यवतमाळ) : ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी म्हणून शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून तालुक्यातील करंजी येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली; परंतु आज या रुग्णालयाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली असून, हे रुग्णालय केवळ शोभेची वस्तू बनले आहे.

या भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी म्हणून १५ वर्षांपूर्वी म्हणजेच २००६ मध्ये करंजी येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. सर्व सोयींनी युक्त असलेले हे ग्रामीण रुग्णालय करंजी येथे सुरू झाल्यामुळे परिसरातील २५ ते ३० गावांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले; परंतु हे समाधान फार काळ टिकले नाही.

आजच्या परिस्थितीत दवाखान्याची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. आरोग्यव्यवस्था पूर्णतः कोलमडली असून, याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. एक्स-रे मशीन आहे, परंतु टेक्निशियन नाही, अशी स्थिती आहे. पॅथॉलॉजी विभागातील रक्ततपासणी सीबीसी मशीनही बंद आहे. त्यामुळे रुग्णांना येथून यवतमाळला रेफर करण्याचे प्रकार वाढले आहेत.

रुग्णांना करंजी येथील व्यापारी संघटना व दानशूर व्यक्तीनी लोकवर्गणीतून रुग्णालयाला ईसीजी मशीन उपलब्ध करून दिली; परंतु कागदाचा रोल नसल्याचे कारण पुढे करून ही मशीन नेहमीच बंद राहते. ईसीजी काढले जात नाही. गंभीर रुग्ण रात्री उशिरा आल्यानंतर डॉक्टर दवाखान्यात उपलब्ध राहत नाहीत. याठिकाणी चार वैद्यकीय अधिकारी आहेत; परंतु चार दिवसांपूर्वी ३० जानेवारी रोजी करंजी येथील एक रुग्ण मध्यरात्री ३ वाजता छातीमध्ये तीव्र वेदना होत असल्यामुळे तातडीने रुग्णालयात गेला; परंतु त्याठिकाणी एकही डॉक्टर उपस्थित नव्हते. दरम्यान, रुग्णाची तब्येत बिघडल्यामुळे त्याला तातडीने यवतमाळ येथे जावे लागले. रुग्णाच्या नातेवाइकांनी याबाबतची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे. दवाखान्याच्या दुरवस्थेबाबत अनेकदा जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्यमंत्र्यांकडे गावकऱ्यांनी तक्रारी केल्या; परंतु याकडे सतत दुर्लक्ष होत आहे.

Web Title: karanja rural hospital condition is deplorable and the health system has completely collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.