‘जय भीम’च्या गजराने दुमदुमला आसमंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 21:56 IST2019-04-14T21:56:29+5:302019-04-14T21:56:43+5:30
निळे ध्वज, निळ्या पताका, निळाची उधळण, जय भीमचा जयघोष आणि स्वागत कमानी यामुळे रविवारी यवतमाळचा संपूर्ण परिसर भीममय झाला होता. निमित्त होते भारतरत्न डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या जयंतीचे. जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली.

‘जय भीम’च्या गजराने दुमदुमला आसमंत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निळे ध्वज, निळ्या पताका, निळाची उधळण, जय भीमचा जयघोष आणि स्वागत कमानी यामुळे रविवारी यवतमाळचा संपूर्ण परिसर भीममय झाला होता. निमित्त होते भारतरत्न डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या जयंतीचे.
जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली. यवतमाळ शहरात दिवसभर भरगच्च कार्यक्रम पार पडले. बसस्थानक चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. शहरालगतच्या सर्व भागातून आलेल्या बाबासाहेबांच्या चाहत्यांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. यामुळे बसस्थानक चौकात बाबासाहेबांच्या अनुयायांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या ठिकाणी पंचशिल ध्वजारोहण आणि बुद्धवंदना पार पडली. समता सैनिक दलाच्या सैनिकांनी बाबासाहेबांना सलामी दिली. ‘निळी पहाट’ हा भीमगीतांचा कार्यक्रम झाला. अल्पोपहाराचे स्टॉलही लावण्यात आले होते.
दुपारी समता बाईक मार्च काढण्यात आला. या बाईक रॅलीमध्ये ५० गावांतील अनुयायी सहभागी झाले होते. या रॅलीचे शहरातील विविध भागात स्वागत करण्यात आले.
सायंकाळी पाटीपुरा परिसरातून मुख्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत बाबासाहेबांचे हजारो अनुयायी सहभागी झाले होते. यावेळी जयभीमच्या गजराने आसमंत दुमदुमला. यासोबत निळीच्या उधळणाने संपूर्ण परिसर निळा झाला होता. या रॅलीचे शहरातील विविध भागात स्वागत झाले. स्थानिक बसस्थानक चौकात रॅलीचा समारोप झाला.