संस्काराची पणती जोपासणे आवश्यक
By Admin | Updated: December 23, 2014 23:14 IST2014-12-23T23:14:03+5:302014-12-23T23:14:03+5:30
आज पाश्चात्य झगमगाटामध्ये आपले मूल्य कुठेतरी लोप पावत असल्याचे दिसून येते. परंतु अशावेळी संस्कारांची पणती जपणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य अविनाश मोहरील यांनी केले.

संस्काराची पणती जोपासणे आवश्यक
अविनाश मोहरील : ‘घराघरातील वृद्धाश्रम’ विषयावर व्याख्यान, आर्णीकर श्रोत्यांची उत्स्फूर्त उपस्थिती
आर्णी : आज पाश्चात्य झगमगाटामध्ये आपले मूल्य कुठेतरी लोप पावत असल्याचे दिसून येते. परंतु अशावेळी संस्कारांची पणती जपणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य अविनाश मोहरील यांनी केले. ते येथील माहेर मंगल कार्यालयात रविवारी आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत ‘घराघरातील वृद्धाश्रम’ या विषयावर बोलत होते.
प्रत्येक घरात संवाद कसा हरपत चालला आहे. त्यामुळे घरोघरी कसे वृद्धाश्रम तयार होत आहेत, यावर अतिशय सुंदर विचार त्यांनी उदाहरणासह व्यक्त केले. माणसाला जवळ आणण्यासाठी जे तंत्रज्ञान विकसित झाले आहे त्या तंत्रज्ञानाचे काही साईड इफेक्टसुद्धा आहे आणि हे ुइफेक्ट आता जाणवायला लागले आहे. या बाबत त्यांनी मोबाईल व टीव्हीचे उदाहरण दिले. या बाबत त्यांनी मोबाईलचे एक उदाहरण दिले. काही महिन्यांपूर्वी मोबाईलमध्ये एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रिमांडर लावण्यात येत होते. परंतु आता तंत्रज्ञान त्याही पुढे गेले आहे. आपण फक्त संबंधित व्यक्तीच्या जन्मतारखेला नाव आणि वेळ टाकून ठेवल्यास त्या दिवशी त्या तारखेला त्याला आपोआप शुभेच्छा संदेश जाईल. हे अॅप्स गेल्या काही दिवसात एकट्या भारतात १३ कोटी लोकांनी वापरल्याचे एका सर्वेतून प्रसिद्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली.
या तंत्रज्ञानामुळे संदेश तर पोहोचतो. परंतु संवाद मात्र होत नाही. हेच यातून दिसत असल्याचे ते म्हणाले. ही परिस्थिती झपाट्याने वाढत आहे. या संबंधी त्यांनी फेसबूक नावाच्या तंत्रज्ञानाचीही काही उदाहरणे दिली. आज छोट्या-छोट्या मुलामुलींकडे मोबाईल आले आहे. यातून ही मुले काय चॅटिंग करतात याकडे आई-वडिलांना लक्ष द्यायला वेळ नाही. याबाबत त्यांनी जळगाव येथील एका कुटुंबाचे उदाहरण दिले. एक ७५ वर्षीय आजोबा माझे तेथील फेसबूक फ्रेन्ड असल्याचे त्यांनी सांगितले. एकदा त्यांना मोहरील यांनी या वयात हे सगळ शिकण्याचं कारण काय, असं विचारलं असता आमचा मुलगा व सून नोकरी करतात. त्यांना आमच्या नातवंडाकडे लक्ष द्यायला वेळच नाही. नातवंड सतत फेसबूकवर असतात. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही हे अद्यावत तंत्रज्ञान शिकवून घेतल्याचे त्या आजोबांनी सांगितल्याचे मोहरील म्हणाले.
लहान मुलांवर नियंत्रण व लक्ष ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान अवगत करणेही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंबातील संवाद कसा वाढेल, लहान मुलांना जास्त वेळ आपण कसा देऊ या बाबत त्यांनी माहिती दिली. कुटुंबातील तिसरी पिढी ही पणती आहे. परदेशी झगमगाटात संस्काराची ही पणती आपल्याला जापायची आहे. २०२० साली देशाला महासत्ता होण्यासाठी आपणाला जी मशाल पाहिजे आहे ती प्रज्वलित करण्यासाठी आजची ही पणती लागणार आहे. आणि या मशालीला आधार देण्यासाठी जे दोन हात लागतील ते हात म्हणजे कुटुंबातील आजी, आजोबा व आई, वडील हे होय. यातून कुटुंबातील तीन पिढ्यांचा समन्वय वाढविला पाहिजे. एकमेकांना हात देत संवाद ठेवून घराघरातील वृद्धाश्रम संपवायला पाहिजे, याची सुरुवात स्वत:पासून करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रबोधनाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)