काेराेना दहशतीमुळे चार खांदेकरीही मिळणे कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 05:00 IST2021-04-14T05:00:00+5:302021-04-14T05:00:06+5:30
अंत्यविधी हा मुलाने किंवा मुलीनेच करावा असा धार्मिक प्रघात आहे. काेराेना दहशतीमुळे आता नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरही अंत्यसंस्कार कठीण झाले आहेत. तिरडीला खांदा देणे पुण्याचे समजले जात हाेते. आता काेराेना महामारीच्या संकटात चार खांदेकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यासाठीसुद्धा अंत्यसंस्कार करणाऱ्याचे पॅकेज ठरले आहे. काेराेना महामारीच्या काळात एकल कुटुंबाची अधिक परवड हाेत आहे. ज्यांचा मुलगा-मुलगी बाहेरगावी अशा कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाल्यास चार जण खांदा देण्यासही मिळत नाहीत.

काेराेना दहशतीमुळे चार खांदेकरीही मिळणे कठीण
सुरेंद्र राऊत
यवतमाळ : सर्वच धर्मात अंत्यसंस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देह त्याग केल्यानंतर आत्म्याचा इहलाेकीचा प्रवास सुरू हाेताे. देहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर ताे पंचत्वात विलीन हाेतो. अंत्यविधी हा मुलाने किंवा मुलीनेच करावा असा धार्मिक प्रघात आहे. काेराेना दहशतीमुळे आता नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरही अंत्यसंस्कार कठीण झाले आहेत. तिरडीला खांदा देणे पुण्याचे समजले जात हाेते. आता काेराेना महामारीच्या संकटात चार खांदेकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यासाठीसुद्धा अंत्यसंस्कार करणाऱ्याचे पॅकेज ठरले आहे.
काेराेना महामारीच्या काळात एकल कुटुंबाची अधिक परवड हाेत आहे. ज्यांचा मुलगा-मुलगी बाहेरगावी अशा कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाल्यास चार जण खांदा देण्यासही मिळत नाहीत. काेराेना आजाराबाबत अनेक संभ्रम आहेत. अनेकदा तपासण्या करून पाॅझिटिव्ह आलेली व्यक्ती मृत्यूच्या पूर्वी निगेटिव्ह येते. अशा मृतांची संख्याही माेठी आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबातील सदस्यच येत नाहीत.
त्यामुळे मुलांनाच आपल्या आई-वडिलांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी एकट्याने उचलावी लागते. अनेकांना तर मृत्यू झाल्यानंतर घरापर्यंतही आणले जात नाही. इतकी भीती आहे. पूर्वी शेजारी, मित्रमंडळी ज्या घरी मृत्यू झाला तेथे आवर्जून जात. काय हवं नकाे ते पाहत हाेते. इतकंच काय ज्या घरात मयत झाली तेथील चूल पेटविली जात नव्हती. त्यामुळे शेजारीपाजारीच किंवा नातेवाइकांकडूनच जेवण, चहा, नाश्ता याची व्यवस्था केली जाई.
काेराेना महामारीच्या दहशतीमुळे आता हा संस्कारच मागे पडला आहे. कधीकाळी महानगरात घडलेले प्रकार आता यवतमाळसारख्या लहानशा शहरात पाहावयास मिळत आहेत. कोरोना महामारी आणखी कुठल्या पातळीवर नेते याचा अंदाज बांधणेही कठीण झाले आहे.
गरिबांना अत्यंंविधीच्या पॅकेजचा खर्च न परवडणारा
काेराेना संशयिताचा मृतदेह थेट रुग्णालयातून स्मशानभूमीत नेला जाताे. त्यासाठी ठराविक रकमेचे पॅकेज माेजले जाते. अंत्यविधीला मदत करणाऱ्यांना साडेचार हजार रुपये द्यावे लागतात. यात ते रुग्णवाहिकेसह सर्व सुविधा पाेहाेचवितात. नंतर स्मशानात सरणाच्या लाकडाकरिता साडेतीन हजार रुपये घेतले जातात. हा नऊ हजार रुपये अंत्यविधीचा खर्च गरिबांना न परवडणारा आहे; मात्र अडचण असल्याने त्यांचाही नाइलाज झाला आहे. काळाच्या ओघात अंत्यविधी हा पार पाडणे कठीण झाले आहे. पॅकेजमध्ये केवळ मृतदेहाला अग्नी दिला जाताे. दुसऱ्या दिवशी राख नातेवाइकांना सुपूर्द केली जाते. यावरून काेराेनामुळे मानवी जनजीवन किती ढवळून निघालंय याची प्रचिती येते.