जमिनीचा मोबदला शेतीतच गुंतवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 21:59 IST2018-03-12T21:59:04+5:302018-03-12T21:59:04+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ करीता शेतकऱ्यांनी कोणतेही आंदोलन न करता विकासात आपले योगदान दिले आहे.

जमिनीचा मोबदला शेतीतच गुंतवा
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ करीता शेतकऱ्यांनी कोणतेही आंदोलन न करता विकासात आपले योगदान दिले आहे. या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वखुशीने जमिनी दिल्या. शासनानेसुध्दा चांगला मोबदला दिला आहे. अधिग्रहीत जमिनीच्या मोबदल्यातून शेतीमध्ये गुंतवणूक केली तर अधिक चांगले उत्पादन आपण घेऊ शकतो, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात शेतकऱ्यांना धनादेश वाटप करताना ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक प्रशांत मेंढे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग ३६१ करीता केंद्राकडून मंजूरी मिळाल्यानंतर निधी देण्यात आला. सर्वांना भरीव व चांगला मोबदला देण्यात आला आहे. या पैशाचे योग्य नियोजन करा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते चंद्रकांत बारी, महेंद्र देवाणी, मोहम्मद मुजीब मोहम्मद सलीम, कैलाश ठोंबरे, महेंद्र ठोंबरे, देविदास कृपलानी, अभय दुबे, प्रकाश टेकडे, नीलेश राठी आदींना धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच चिचघाट येथील वनिता दिलीप गायकवाड आणि कृष्णापूर येथील सविता रामसिंग जाधव या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदतीचा धनादेश देण्यात आला.