नेर शिवसेनेतील नाराजांकडून पक्षातील पर्यायांची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 22:10 IST2018-07-20T22:10:14+5:302018-07-20T22:10:39+5:30
महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्यातील अंतर्गत धुसफूसीचे लोण नेरपर्यंत पोहोचले आहे. तालुक्यात एकीने राहिलेल्या शिवसेनेला आता गटातटाची वाळवी लागली आहे. प्रामुख्याने संजय राठोड यांच्यावर नाराजी व्यक्त करत अनेकांनी भावना गवळी यांच्या गटाची वाट धरली आहे.

नेर शिवसेनेतील नाराजांकडून पक्षातील पर्यायांची चाचपणी
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्यातील अंतर्गत धुसफूसीचे लोण नेरपर्यंत पोहोचले आहे. तालुक्यात एकीने राहिलेल्या शिवसेनेला आता गटातटाची वाळवी लागली आहे. प्रामुख्याने संजय राठोड यांच्यावर नाराजी व्यक्त करत अनेकांनी भावना गवळी यांच्या गटाची वाट धरली आहे. कार्यकर्तेच नव्हे तर पदाधिकारीही याच वाटेवर आहे. विशेष म्हणजे कट्टर समर्थकांनी संजय राठोड यांना यापूर्वीच सावधही केले होते. त्यांनी हा विषय सहज घेतला होता.
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या नेरमध्ये शिवसेनेने आपली पकड मजबूत केली. हळूहळू स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. अर्थातच यात ना. संजय राठोड यांची मेहनत आहे. परंतु अलिकडे काही वर्षात गट तयार होत गेले. याला ब्रेक लावला गेला नाही. शिवसैनिकांपुढे नेता म्हणून तालुक्यात दुसरा चेहरा नव्हता. ना. संजय राठोड यांच्याशिवाय पर्याय नसल्याने कार्यकर्ते डिकून होते.
ना. संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यात पडलेली मतभेदाची ठिणगी नाराज कार्यकर्त्यांसाठी मोठा आधार ठरली आहे. संजय राठोड यांचे विरोधक मानले जाणारे कार्यकर्ते भावना गवळी यांच्या तंबूत दिसत आहे. वास्तविक भावना गवळी यांचे लोकसभेतील मताधिक्य वाढविण्यात संजय राठोड यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली. मागील काही महिन्यांपासून नेर तालुक्यात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये भावना गवळी यांची हजेरी नगण्य आहे. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या फलकावरूनही त्या बाहेर गेल्या आहे. या दोन नेत्यांमध्ये निर्माण झालेली दरी नाराजांसाठी संधी ठरत आहे.