दीड हजार तूर उत्पादकांची चौकशी
By Admin | Updated: May 29, 2017 00:41 IST2017-05-29T00:41:23+5:302017-05-29T00:41:23+5:30
जिल्ह्यातील तब्बल दीड हजार शेतकऱ्यांची आता चौकशी केली जाणार आहे. वाजवीपेक्षा जादा तूर विक्री केल्याचा ठपका

दीड हजार तूर उत्पादकांची चौकशी
जादा विक्रीचा संशय : सहायक निबंधकांना कारवाईचे निर्देश
रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल दीड हजार शेतकऱ्यांची आता चौकशी केली जाणार आहे. वाजवीपेक्षा जादा तूर विक्री केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधकांनी अशा शेतकऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहे.
जिल्ह्यात १५ शासकीय तूर खरेदी केंद्रांवर २२ एप्रिलपर्यंत तब्बल दोन लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली. ही तूर शेतकऱ्यांची, की व्यापाऱ्यांची, याचा शोध घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. काही शेतकऱ्यांच्या नावे जादा तूर विकल्याचे आढळले होते. यात काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सातबारावर आपली तूर विकल्याचे आढळले होते. त्यामुणे प्रभारी जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवी यांनी सर्व सहाय्यक निबंधकांना चौकशीचे आदेश दिले.
आता सर्व सहाय्यक निबंधकांनी जादा तूर विक्रीची चौकशी सुरू केली. यात २५ क्विंटलपेक्षा जादा अथवा शासकीय नियमांचे उल्लंघन करून तूर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. प्रत्येक खरेदी केंद्राने अशा १०० शेतकऱ्यांची यादी सहाय्यक निबंधकांना सादर केली. १५ केंद्रांवरील या दीड हजार शेतकऱ्यांची आता चौकशी होणार आहे.
यवतमाळ, दारव्हा व नेर केंद्राने शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे. पुसद आणि महागाव केंद्रावरील शेतकऱ्यांचे दस्तावेज तपासले जात असून नियमांचे उल्लंघन आढळल्यास शेतकऱ्यांवर थेट कारवाई होणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर जादा तूर विक्री झाली, ते संकटात सापडणार आहे.
निम्म्या शेतकऱ्यांची चौकशीला पाठ
सहाय्यक निबंधकांनी या शेतकऱ्यांना नोटीस बजावून चौकशीकरिता हजर राहण्याचे निर्देश दिले. मात्र नोटीस मिळूनही धास्तीमुळे अनेक शेतकरी दस्तावेज घेऊन आलेच नाही. आता जे शेतकरी केंद्रात चौकशीला आले नाही, त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. त्यांना फेरनोटीस बजावण्यात येणार आहे. यानंतरही शेतकरी न आल्यास उपलब्ध दस्तावेजानुसार त्यांच्यावर फौजदारीची कारवाई केली जाणार आहे.
आम्हाला चोर समजता का ?
नोटीस बजावल्यानंतर काही शेतक ऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली. त्यांनी शेती व त्यात पिकविलेली तूर, याची माहिती त्यांना दिली. प्रचंड संतापलेल्या शेतकऱ्यांनी ‘आम्हाला चोर समजता का’, असा प्रश्न लोकप्रतिनिधींना विचारला. यामुळे आता लोकप्रतिनिधी सहाय्यक निबंधकांना धारेवर धरत आहेत. यामुळे पुढील काही दिवसात चौकशी प्रकरणात नवा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.