पैशांच्या उधळपट्टीवरून चौकशी, उघड झाली चोरीची घटना
By विशाल सोनटक्के | Updated: February 10, 2024 19:22 IST2024-02-10T19:22:49+5:302024-02-10T19:22:58+5:30
शिंदेनगरमधील रेकॉर्डवरील एक सराईत मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करीत आहे.

पैशांच्या उधळपट्टीवरून चौकशी, उघड झाली चोरीची घटना
यवतमाळ: शिंदेनगरमधील रेकॉर्डवरील एक सराईत मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करीत आहे. तसेच दागिने विक्रीसाठी गिऱ्हाईक शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने त्यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर चापमनवाडीतील घरफोडीच्या गुन्ह्याची उकल झाली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. घरफोडीसह मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शनिवारी या पथकास रेकॉर्डवरील सराईत रवी मेश्राम याच्याबाबत माहिती मिळाली.
त्याने चोरी केल्याची कुजबूज असून मागील काही दिवसात तो मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करीत आहे, तसेच सोन्याचे दागिने विक्रीकरिता आझाद मैदान परिसरात गिऱ्हाईक शोधत असल्याचेही समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदेनगरमधून रवी मेश्राम यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने चापमनवाडी येथील घरफोडीची कबुली दिली. या गुन्ह्यात चोरी केलेले ९२ हजार ८०० रुपये किमतीचे १५.७४० ग्रॅम सोन्याचे दागिने, १८ हजार ५०० रुपये किमतीचे चांदीचे शिक्के व चांदीच्या वस्तू असा एकूण १ लाख ११ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी आरोपीला अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.