कालबाह्य वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक
By Admin | Updated: June 26, 2014 00:03 IST2014-06-26T00:03:51+5:302014-06-26T00:03:51+5:30
महागाव तालुक्यात कालबाह्य वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असून पोलीसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. खिळखिळे झालेले वाहन आणि नवशिके चालक यामुळे प्रवाश्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

कालबाह्य वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक
धनोडा : महागाव तालुक्यात कालबाह्य वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असून पोलीसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. खिळखिळे झालेले वाहन आणि नवशिके चालक यामुळे प्रवाश्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
महागाव तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून अवैध प्रवासी वाहतूक जोमात सुरू आहे. पुसद ते माहूर, महागाव ते उमरखेड आणि इतर मार्गावर ही वाहतूक सुरू आहे. दररोज शेकडो वाहने धावत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसपुढे ही वाहने धावत असल्याने एसटीला प्रवासीच मिळत नाही. या प्रकाराने अनेक बसफेऱ्याही बंद झाल्या. वर्षानुवर्षे तेच वाहने रस्त्यावर धावत आहे. जुजबी डागडुजी करून वाहन चालविले जाते. त्यातच पुसद ते माहूर मार्गावरील कान्हाजवळ रस्ता उखडलेला आहे. तसेच धनोडा ते माहूर मार्गही उखडलेला आहे. उखडलेल्या रस्त्यावरून कालबाह्य वाहने खचाखच प्रवासी भरून धावताना दिसत आहे. प्रवाश्यांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. या प्रकारामुळे अपघातात वाढ झाली आहे.
महागाव पोलीस अर्थपूर्ण संबंधामुळे या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. यवतमाळ, उमरखेड, पुसद, माहूर या मार्गावर शेकडो वाहने धावत असताना पोलिसांना मात्र ते दिसत नाही. आरटीओ अधिकारी या रस्त्यावरून येत असल्यास आगाऊ सूचना मिळते. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट असतो. अधिकाऱ्यांनाही सर्व आलबेल असल्याचे दिसते. मात्र कालबाह्य वाहने प्रवाश्यांसाठी जीव घेणे ठरत आहे. (वार्ताहर)