पैशांच्या वादातून पोटच्या मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 12:04 IST2021-10-14T11:42:56+5:302021-10-14T12:04:48+5:30
उधारीचे पैसे परत करायचे आहे, त्यासाठी सोयाबीन विकून आलेल्या रकमेतून पैसे द्या, असे म्हणत लेकाने दारूच्या नशेत वडिलांसोबत वाद घातला. या वादात त्याने रागाच्या भरात स्वत:च्या वडिलावरच वखराच्या पासीने वार केले. यात वडिलांचा मृत्यू झाला.

पैशांच्या वादातून पोटच्या मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून!
यवतमाळ : सोयाबीन विक्रीच्या किरकोळ वादातून लेकाने दारूच्या नशेत जन्मदात्या बापाच्या डोक्यावर वखराची लोखंडी पास मारून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री अमृतनगर येथे घडली असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
मारोती तुकाराम गादेकर (६२) असे मृत वडिलाचे नाव आहे; तर अनिल मारोती गादेकर (३५) असे आरोपी मुलाचे नाव आहे. मारोती गादेकर यांनी स्वत:च्या शेतातील सोयाबीन विकले होते. त्याचे पैसे घरी होते. यावरूनच अनिलने स्वत:च्या वडिलांसोबत वाद घालणे सुरू केले. तो दारूच्या नशेत रोज धिंगाणा घालायचा. उधार-उसनवार घेतलेले पैसे परत करायचे आहेत. मला पैसे पाहिजेत, म्हणत वडिलांना त्रास द्यायचा.
मंगळवारीही त्याने उधारीचे पैसे परत करायचे आहे, त्यासाठी सोयाबीन विकून आलेल्या रकमेतून पैसे द्या, अशी रट लावली. मात्र, तो व्यसनाच्या अधीन असल्याने वडील मारोती यांनी त्याला पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे संतापलेल्या अनिलने घरात पडून असलेली वखराची पास वडिलांच्या डोक्यात घातली. यात मारोती गादेकर जागीच गतप्राण झाले. मदतीसाठी कुटुंबातील सदस्य पुढे आले असता ‘त्यांनासुद्धा तुमचीही अशीच गत करीन,’ असे धमकावत अनिलने पळ काढला.
तो अंधाराचा फायदा घेत जंगलात पळून गेला. घटनेची माहिती मिळताच खंडाळ्याचे ठाणेदार बालाजी शेंगेपल्लू यांनी आरोपीचा शोध घेणे सुरू केले. आरोपी अनिल गादेकर याला सावरगाव बंगला येथे अटक केली. त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.