जिल्हा परिषदेत आंतरजातीय विवाह

By Admin | Updated: March 9, 2017 00:12 IST2017-03-09T00:12:58+5:302017-03-09T00:12:58+5:30

मोर्चेकऱ्यांचा आक्रोश, आंदोलकांच्या आरोळ्या, अधिकाऱ्यांचा आव, कर्मचारी संघटनांची अहमहमिका,

Inter-caste marriages in Zilla Parishad | जिल्हा परिषदेत आंतरजातीय विवाह

जिल्हा परिषदेत आंतरजातीय विवाह

समुपदेशन केंद्र : वधूच्या आग्रहाखातर निवडला महिलादिनाचा मुहूर्त, भारतीय संविधानाची प्रत भेट
यवतमाळ : मोर्चेकऱ्यांचा आक्रोश, आंदोलकांच्या आरोळ्या, अधिकाऱ्यांचा आव, कर्मचारी संघटनांची अहमहमिका, खास ‘शासकीय’ सुस्तीत सरकणाऱ्या फाईल... या सर्वांची साक्षीदार ठरलेली जिल्हा परिषदेची इमारत बुधवारी एका विवाह सोहळ्यासाठी मंगल कार्यालय बनली. जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सोडविणाऱ्या या ‘मिनी मंत्रालया’ने आज दोन हृदय जोडण्यासोबतच दोन जातीतील भिंतही तोडली.
सावित्री आणि धनंजय हे दोन जातीतील प्रेमी जीव ‘महिलादिनी’ विवाहबद्ध झाले. जिल्हा परिषदेच्या इमारतीत असलेल्या सलोखा महिला समुपदेशन केंद्राने हा सोहळा अतिशय साध्या तरीही प्रागतिक पद्धतीने घडवून आणला. राष्ट्रसंतांचे विचार प्रसृत करणाऱ्या मानवता मंदिरात सकाळी विवाहाची औपचारिकता पार पाडून वधू-वरांना जिल्हा परिषद इमारतीत आणण्यात आले. समुपदेशन केंद्र आणि महिला व बालकल्याण विभागाच्या पुढील ‘कॉरिडॉर’मध्ये सोहळा घेण्यात आला. मॉ जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी आंतरजातीय विवाह करून सुखी जीवन जगणाऱ्या काही दाम्पत्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. सलोखा केंद्राचे संस्थापक देवानंद पवार यांनी उभयतांना लग्नाची भेट म्हणून भारतीय संविधानाची प्रत दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मरसाळे, माजी नगरसेविका माधुरी अराठे यांनी विचार मांडले. संचालन कवी हेमंत कांबळे यांनी केले. डॉ. विजय मून, अ‍ॅड. प्रदीप वानखडे, समुपदेशक शालिनी धारगावे, गजानन उल्हे, समाज कल्याण निरीक्षक अमित कापसे, महल्ले आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

आत्महत्येच्या विचाराकडून जगण्याच्या कृतीकडे...

या लग्नातील वर धनंजय राजेंद्र वानखडे (२९) रा. शेंद्री बु. ता. दारव्हा हा शेती करतो. पण नापिकी आणि कर्जामुळे तो आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचला होता. त्यामुळेच आपली प्रेयसी सावित्री लक्ष्मण ढोके (२८) रा. महागाव कसबा ता. दारव्हा हिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याचे मन मानत नव्हते. जगणेच कठीण असताना संसार कसा मांडवा हा त्याच्यापुढे प्रश्न होता. याच निराशेतून त्याने काही महिन्यांपूर्वी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयापुढे विषही प्राषण केले होते. सुदैवाने त्यातून तो बचावला. सावित्रीने ही त्याची काहाणी सलोखा समुपदेशन केंद्रात सांगितल्यावर दोघांचेही समुपदेशन करून त्यांचे लग्न लावून देण्यात आले. धनंजय एमए असून सावित्री एमए, बीएडपर्यंत शिकली आहे. दोघेही सामाजिक कामात सक्रिय असतात. सावित्रीने ‘हागणदारीमुक्ती’वर निर्माण झालेल्या लघुपटात मुख्य भूमिका बजावली आहे.
 

Web Title: Inter-caste marriages in Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.