जिल्ह्यात इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क उभारणार
By Admin | Updated: December 30, 2016 00:03 IST2016-12-30T00:03:58+5:302016-12-30T00:03:58+5:30
कापसापासून कापड निर्मिती स्थानिक पातळीवर झाली तरच शेतकरी, बेरोजगार आणि महिलांना रोजगार उपलब्ध होईल.

जिल्ह्यात इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क उभारणार
मुख्यमंत्र्यांची घोषणा : आमदारांना पाठबळाची ग्वाही
गजानन अक्कलवार कळंब
कापसापासून कापड निर्मिती स्थानिक पातळीवर झाली तरच शेतकरी, बेरोजगार आणि महिलांना रोजगार उपलब्ध होईल. कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.
‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाच्या समारोपात आयोजित मुख्यमंत्री समाधान शिबिरात ते बोलत होते. यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. शासनाने सुरूकेलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्यात घट होत आहे. आता शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, महिला व बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी कापूस प्रक्रिया उद्योगावर शासनाचा भर आहे. त्याचा पहिला प्रयोग अमरावती येथे करण्यात आला. तसाच प्रयत्न यवतमाळ जिल्ह्यात केला जाणार असून लवकरच येथे इंटिग्रेटेड पार्क उभारला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. हा पार्क नेमका कुठे उभारायचा हे जिल्ह्यातील आमदारांनी एकत्र येऊन ठरवावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी आपल्या मतदारसंघातील अनेक अडचणी मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या. त्यात मायक्रो फायनान्स कंपनीमुळे महिलांची झालेली अवस्था, मतदारसंघात शेतमालावर आधारित प्रकल्प, सिंचन क्षमता वाढविण्यासाठी बेंबळा कालव्याची अर्धवट कामे तातडीने पूर्ण करावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. अशोक उईके यांनी आपल्या दोन वर्षाच्या काळात अनेक लोकोपयोगी कामे केली. त्यांच्या कामामुळे ते कौतुकास पात्र आहे. त्यांच्यात कामाची तळमळ असून एखादे काम मागे लागून करून घेण्याचा त्यांचा हातखंडा आहे. १३२ केव्ही सब स्टेशनची मंजुरात मिळणे हाही त्याचाच भाग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
चक्रावती नदीच्या सौंदर्यीकरणासाठी आमदार उईके यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करीत मुख्यमंत्री म्हणाले, या कामासाठी आम्ही निधी कमी पडू देणार नाही. चक्रावती नदी बारमाही खळखळून वाहती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
आमदार डॉ. उईके यांनी आपल्या भाषणात आगामी काळात महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची साथ हवी, अशी विनंती केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळेल आणि विकासाची गंगा येईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
४० टक्के शेतकरी आत्महत्या घटल्या
यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून परिचित आहे. हा कलंक पुसून टाकण्यासाठी शासनाने जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान सुरू केले. या अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे शेतकरी आत्महत्येत तब्बल ४० टक्क्यांची घट झाल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. उर्वरित ६० टक्के आत्महत्या कमी करून येत्या पाच वर्षात जिल्हा शेतकरी आत्महत्या मुक्त करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नगराध्यक्षांची नाराजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात नगराध्यक्षांना सन्मानाने सहभागी करून घेणे अपेक्षित होते. कार्यक्रम पत्रिकेवर त्यांच्या नावाचा उल्लेख असायला हवा होता. परंतु प्रोटोकॉल न पाळता कार्यक्रम घेण्यात आला. यावर कळंबचे नगराध्यक्ष दिगांबर मस्के यांनी आपली नाराजी व्यक्त केली.