एक हजार रोहित्र तत्काळ उपलब्ध करण्याचे निर्देश

By Admin | Updated: November 29, 2014 23:27 IST2014-11-29T23:27:25+5:302014-11-29T23:27:25+5:30

जिल्ह्यात पाण्याचे भरपूर स्रोत आहे. भूजल पातळीही चांगली आहे. पण वीज मिळत नसल्याने सिंचन होत नाही. हा प्रश्न धसास लावण्यासाठी तत्काळ एक हजार रोहित्र उपलब्ध करा.

Instructions for making available one thousand visitors immediately | एक हजार रोहित्र तत्काळ उपलब्ध करण्याचे निर्देश

एक हजार रोहित्र तत्काळ उपलब्ध करण्याचे निर्देश

हंसराज अहीर : आठ नव्या उपकेंद्रासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना
यवतमाळ : जिल्ह्यात पाण्याचे भरपूर स्रोत आहे. भूजल पातळीही चांगली आहे. पण वीज मिळत नसल्याने सिंचन होत नाही. हा प्रश्न धसास लावण्यासाठी तत्काळ एक हजार रोहित्र उपलब्ध करा. तसेच पुरेशी वीज उपलब्ध व्हावी यासाठी आठ नव्या वीज उपकेंद्रांसाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश केंद्रीय रसायनिक व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना शनिवारी दिले.
जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले असता त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आदींची बैठक घेतली.
जिल्ह्यातील ७३५ रोहित्र जळाले आणि चोरीस गेल्याचे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ना.अहीर यांना यावेळी सांगितले. त्यामुळेच वीज वितरणात अडचणी येत असून, सुरळीत वीज पुरवठ्यासाठी १३२ के.व्ही.च्या आठ वीज उपकेंद्रांची आवश्यकता असल्याची माहिती दिली. त्यावर शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळून सिंचनात वाढ व्हावी. उद्योगांनाही पुरेशी वीज मिळावी, असे अपेक्षित असल्याचे सांगून अहीर यांनी जिल्ह्यासाठी तत्काळ एक हजार नवीन रोहित्र उपलब्ध करण्याचे आणि आठ नव्या उपकेंद्रासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवरही कारवाई करण्यास त्यांनी सांगितले.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात पाच हजार ३०० विहिरी निर्मितीचे उद्दीष्ट होते. प्रत्यक्षात ३२० विहिरीही पूर्ण झाल्या नाही. धडक सिंचन विहिरीही निधी अभावी रखडल्याचे लक्षात आणून दिले. त्यावर ना.अहीर यांनी या विहिरी येत्या तीन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
पांढरकवडा, झरी जामणीसह इतर तालुक्यांमध्ये झालेल्या रोहयोतील भ्रष्टाचाराच्या चौकशीचा आढावा त्यांनी घेतला. तसेच दोषी असलेले अधिकारी आणि कंत्राटदार यांची गय करू नका अशा सूचनाही दिल्या. त्याबरोबर जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पाच्या स्थितीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. प्रकल्पातील पाणीसाठा वाढविण्यासाठी खोलीकरण, गाळ काढणे असे कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना केल्या.
आरोग्य विभागाचाही आढावा त्यांनी घेतला. जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या रक्त तपासणीसाठी ४३ गट निर्माण करण्यात आले होते. मात्र अद्यापही रक्त तपासणीला सुरूवात झाली नसल्याची बाब पुढे आली. त्यावर ना.अहीर यांनी तत्काळ ही योजना हाती घेण्याचे निर्देश दिले. एनआरएचएम अंतर्गत विविध आरोग्याच्या सुविधा पुरवून तीन व्हॅन खरेदीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या.
आढावा बैठकीला आमदार मदन येरावार, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार प्रा. राजू तोडसाम यासह विविध पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Instructions for making available one thousand visitors immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.