महानिरीक्षकांनी ऐकली पोलिसांची गाऱ्हाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST2019-11-24T06:00:00+5:302019-11-24T06:00:12+5:30

वार्षिक निरीक्षणाची पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली होती. निवडणूक बंदोबस्त आटोपल्यानंतर प्रत्येक जण आपल्याकडील पेंडींग गुन्हे हातावेगळे करण्यात व्यस्त होते. इतकेच नव्हे तर पोलीस ठाणे परिसराची कधी नव्हे अशी स्वच्छताही करण्यात आली. वार्षिक निरीक्षणात पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील पथकाने मुद्देनिहाय आढावा घेऊन त्याचे टिपन तयार केले.

Inspector General heard police complain | महानिरीक्षकांनी ऐकली पोलिसांची गाऱ्हाणी

महानिरीक्षकांनी ऐकली पोलिसांची गाऱ्हाणी

ठळक मुद्देवार्षिक निरीक्षण। पोलीस परेडची पाहणी आणि दरबार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण करण्यात आले. पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे हे मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात होते. त्यांनी वणी उपविभागापासून निरीक्षणाला सुरुवात केली. नंतर पुसद, उमरखेड व यवतमाळ उपविभागातील एकंदर कामगिरीचा आढावा मुद्देनिहाय घेतला. शनिवारी पोलीस महानिरीक्षकांनी येथील पोलीस मुख्यालयात झालेल्या परेडची पाहणी केली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांचा दरबार घेतला.
वार्षिक निरीक्षणाची पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली होती. निवडणूक बंदोबस्त आटोपल्यानंतर प्रत्येक जण आपल्याकडील पेंडींग गुन्हे हातावेगळे करण्यात व्यस्त होते. इतकेच नव्हे तर पोलीस ठाणे परिसराची कधी नव्हे अशी स्वच्छताही करण्यात आली. वार्षिक निरीक्षणात पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील पथकाने मुद्देनिहाय आढावा घेऊन त्याचे टिपन तयार केले. त्यानंतर उपविभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामकाजाबाबत सूचनाही देण्यात आल्या. वार्षिक निरीक्षणादरम्यान दोन दिवस पोलीस महानिरीक्षक यवतमाळ मुक्कामी होते. शनिवारी पोलीस परेडचे निरीक्षण करताना जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर उपस्थित होत्या.
यावेळी जिल्हा पोलीस दलाकडून महानिरीक्षकांना मानवंदना देण्यात आली. परेडनंतर काही प्रात्यक्षिके पोलीस दलातील जवानांनी सादर केली. मुख्यालयात १ ते दुपारी २ वाजता दरबार चालला. त्यानंतर महानिरीक्षक अमरावतीकडे रवाना झाले.

समस्यांचे तातडीने निराकरणाचा प्रयत्न
पोलीस अधीक्षक स्तरावर समस्यांचा निपटारा न झाल्याने काही कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयीन कामकाजाबाबत पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांच्यापुढे समस्या मांडल्या. यावेळी महानिरीक्षकांनीही कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. यात वेतन निश्चिती, पदोन्नती, होमलोन अशा अनेक मुद्यांवर कर्मचाऱ्यांनी महानिरीक्षकांपुढे प्रश्न उपस्थित होते. त्यांच्या प्रश्नांचे तितक्याच आत्मियतेने निराकरण करण्यात आले. याबाबत स्थानिक वरिष्ठांनाही सूचना दिल्या.

Web Title: Inspector General heard police complain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस