आझाद मैदानातील वसुलीत अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:00 AM2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:00:34+5:30

आझाद मैदानातील दुकानांच्या महसूल वसुलीत लाखो रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय महसूल अधिकारी अनिरूध्द बक्षी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदारांच्या नेतृत्वात चार सदस्यीय समिती नेमली.

Injured in Azad Maidan recovery | आझाद मैदानातील वसुलीत अपहार

आझाद मैदानातील वसुलीत अपहार

Next
ठळक मुद्देमहिला तलाठी वादात : चौघांची चौकशी समिती

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ शहराची चौपाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आझाद मैदानातील दुकानांच्या महसूल वसुलीत लाखो रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय महसूल अधिकारी अनिरूध्द बक्षी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदारांच्या नेतृत्वात चार सदस्यीय समिती नेमली.
आझाद मैदानात अनेक हातगाड्या व दुकाने थाटली जातात. त्यापोटी नियमानुसार शासनाकडे चालानमार्फत रक्कम भरावी लागते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या दुकानांकडून परस्परच मासिक वसुली केली गेली, त्याच्या रितसर पावत्याही दिल्या गेल्या नाही. उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयातील महिला तलाठ्याच्या या गैरप्रकाराची महसूल खात्यात चर्चा होऊ लागली. दरम्यान, या अनुषंगाने उपविभागीय महसूल अधिकारी बक्षी यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली. हा गंभीर प्रकार निदर्शनास येताच बक्षी यांनी नायब तहसीलदार एकनाथ बिजवे यांच्या नेतृत्वात चौकशी समिती नेमली. या समितीमध्ये नंदकिशोर शिरभाते, महेंद्र कठणकर व अमोल बोंद्रे यांचा समावेश आहे. या समितीने ८ नोव्हेंबर रोजी आझाद मैदान येथे जाऊन इन कॅमेरा बयाणे नोंदविली. तेव्हा आकाश नामक युवक २२ दुकानांकडून दरमहा ५०० रुपयेप्रमाणे, एक काका आठ दुकानांकडून दरमहा हजार रुपये तर काही दुकानांकडून वसीम नामक युवक वसुली करीत असल्याचे मात्र त्याच्या पावत्या दिल्या जात नसल्याचे पुढे आले. चौकशीच्या भीतीने काहींनी आपली दुकानेच बंद केली आहेत. या प्रकरणाचा अहवाल सोमवारी सादर होणार आहे. आझाद मैदानातील ही वसुली सप्टेंबर २०१८ पासून महसूल विभागाने आपल्या ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते. तत्कालिन महसूल अधिकाºयाच्या आशीर्वादाने ही परस्पर वसुली सुरू होती, असे सांगितले जाते.
आझाद मैदानात नियमित दुकानांची संख्या कमी दिसत असली तरी वर्षेभर मीनाबाजार, क्राफ्ट मेला, स्वेटर विक्रेते यांची दुकाने लागतात. त्यांच्याकडून होणारी वसुली वेगळीच असते. त्यामुळे अपहाराची रक्कम नेमकी किती लाख असावी, याचा अंदाज महसूल यंत्रणेतून लावला जातो आहे.
विद्यमान एसडीओंच्या सतर्कतेने हा घोटाळा पुढे आला, एवढे निश्चित ! यापूर्वी मात्र या घोटाळ्याला प्रशासनातून अभयच दिले गेल्याचे बोलले जाते.

तक्रारदारांना आता जादा रक्कम परताव्याचे आमिष
या चौकशीची कुणकुण लागताच त्या महिलेने सारवासारव सुरू केली आहे. दुकानदारांना त्यांच्याकडून वसूल केलेल्या रकमेपेक्षा आणखी पाच-दहा हजार रुपये जास्त देण्याची तयारी दर्शविली आहे. केवळ त्यांनी लेखी अथवा आपल्याविरोधात बयाण देऊ नये, दिले असेल तर ते परत घ्यावे, अशी अट ठेवण्यात आली.

Web Title: Injured in Azad Maidan recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.