यवतमाळ जिल्ह्यातील ‘साथरोग’ माहिती यंत्रणा वर्षभरापासून कोलमडलेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 12:44 IST2017-11-03T12:34:20+5:302017-11-03T12:44:22+5:30
आरोग्य विभागाची ‘हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम’ (एचएमआयएस) कोलमडल्याने वेळीच फवारणीतून विषबाधा प्रकरणाची माहिती मिळाली नाही. परिणामी २२ शेतकरी, मजुरांना प्राण गमवावे लागल्याचे पुढे येत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील ‘साथरोग’ माहिती यंत्रणा वर्षभरापासून कोलमडलेली
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : आरोग्य विभागाची ‘हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम’ (एचएमआयएस) कोलमडल्याने वेळीच फवारणीतून विषबाधा प्रकरणाची माहिती मिळाली नाही. परिणामी २२ शेतकरी, मजुरांना प्राण गमवावे लागल्याचे पुढे येत आहे.
जिल्हा साथरोग अधिकाऱ्यांच्या अधिनस्त जिल्ह्यात ‘हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम’ (एचएमआयएस) प्रणाली अस्तिवात आहे. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात साथरोगांची लागण झाल्यास या यंत्रणेला तातडीने वरिष्ठांना माहिती द्यावी लागते. त्याबाबतचा अहवाल सादर करावा लागतो. मात्र वर्षभरापासून ही संपूर्ण यंत्रणाच कोलमडलेली होती, अशी माहिती समोर येत आहे. परिणामी जून महिन्यापासून कीटनाशकांच्या फवारणीतून विषबाधा होऊनही आॅक्टोबर महिन्यापर्यंत या यंत्रणेला या गंभीर प्रकाराची कोणतीच माहिती नव्हती.
प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी या यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावतात. संबंधित परिसरातील आरोग्य कर्मचारी त्यांना परिसरातील साथरोगांंच्या लागणीबाबत माहिती देतात. ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा साथरोग अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी व आरोग्य उपसंचालकांकडे पाठविली जाते. मात्र जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा होत असताना आणि शेतकरी, मजुरांचे बळी जात असताना ही यंत्रणा निद्रीस्त होती. आता खडबडून जागे झालेल्या यंत्रणेने डेली रिपोर्टींग सुरू केली.
या यंत्रणेत जेथे कुणाचा मृत्यू झाला, ती यंत्रणा एचआयएमएसला माहिती कळविते. मात्र साथरोग अधिकाऱ्यांना वेळ नसल्याने त्यांनी कदाचित संगणक सुरूच केले नसावे, अशी चर्चा आहे. आजाराचे निदान, रूग्णाच्या मृत्यूचे कारण याची माहिती घेऊन एचआयएमएस यंत्रणेने वरिष्ठांना मृत्यू संशोधन अहवाल सादर करणेही आवश्यक असते. मात्र फवारणीतून विषबाधा प्रकरणात यापैकी कोणतीच माहिती या यंत्रणेकडे नसल्याचे स्पष्ट होत आहे. फवारणीतील विषबाधा प्रकरणात सर्वच विभागाची गावपातळीवरील यंत्रणा फेल ठरल्याचे दिसून येते. मात्र वरिष्ठांना सोडून कनिष्ठांना नोटीस बजावल्या जात असल्याने सामान्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष दिसून येत आहे.
साथरोगांची लागण झाल्यास संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ‘इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट’ मागितला जातो. वैद्यकीय अधिकाऱ्याला तपास करावा लागतो. मात्र फवारणीतील विषबाधा प्रकरणानंतर अद्यापही अशाप्रकारचा कोणताच अहवाल मागविण्यात आला नाही. तथापि डेली रिपोर्टींग मात्र घेतले जात असल्याचा दावा यंत्रणेकडून केला जातो. कृषी विभागासोबतच आरोग्य, महसूल यंत्रणा या प्रकरणात तेवढीच जबाबदार आहे. मात्र सर्वच यंत्रणा कनिष्ठ कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून वरिष्ठ अधिकाºयांना सहीसलामत बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील झाल्याचे दिसत आहे.
जुन्या तारखेत बजावली आरोग्यसेवकांना नोटीस
विषबाधा प्रकरणात माहिती न दिलयाा ठपका ठेवून २१ आरोग्य सेवकांना नोटीस बजावण्यात आली. या नोटीसवर १३ आॅक्टोबर ही तारीख आहे. मात्र अद्याप बहुतांश आरोग्य सेवकांना नोटीस मिळालीच नाही. विशेष म्हणजे नोटीसमध्ये त्यात शेतकरी, शेतमजुराच्या मृत्यूची तारीखही चुकीची दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे ही नोटीस बॅकडेटमध्ये काढली गेल्याची शंका उपस्थित केली जात आहे.
‘एचआयएमएस’कडे केवळ विष घेतलेल्या रूग्णांची माहिती असते. कारण ते प्रथम आरोग्य उपकेंद्र, केंद्र, ग्रामीण रूग्णालयात दाखल होतात. फवारणीतून विषबाधा झालेले रूग्ण ‘कॉन्टॅक्टेड पॉईझनिंग’ या प्रकारात मोडतात. त्यामुळे एचआयएमएसकडे याबाबत माहिती नाही.
- डॉ. के.के. कोषटवार,
जिल्हा साथरोग अधिकारी