वाघांच्या वाढत्या संख्येने वन्यप्रेमींत आनंद; पण शेतकरी दहशतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST2020-03-22T06:00:00+5:302020-03-22T06:00:34+5:30
शेतात काम करण्यासाठी मजूर जायला तयार नसतात. वन्यजीवांकडून पिके उद्ध्वस्त केली जातात. त्यातच व्याघ्र हल्ल्यात जनावरांची हानी होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधनच शेती आहे. मात्र या उत्पन्नावरच घाला घातला जात आहे. मग आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

वाघांच्या वाढत्या संख्येने वन्यप्रेमींत आनंद; पण शेतकरी दहशतीत
प्रविण पिन्नमवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : तालुक्यातील टिपेश्वर अभ्यारण्यासह परिसरातील जंगलात वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली. यामुळे वन्यप्रेमी आनंद व्यक्त करीत असले तरी शेतकऱ्यांत मात्र दिवसेंदिवस भय वाढत चालले आहे.
अभयारण्यासह परिसरातील जंगलात वाघांसाठी योग्य व्यवस्थापन नसल्याने हे वाघ परिसरातील शेतात, कधी गावात शिरून जनावरांवर तर कधी मजुरांवर हल्ले करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली.
शेतात काम करण्यासाठी मजूर जायला तयार नसतात. वन्यजीवांकडून पिके उद्ध्वस्त केली जातात. त्यातच व्याघ्र हल्ल्यात जनावरांची हानी होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधनच शेती आहे. मात्र या उत्पन्नावरच घाला घातला जात आहे. मग आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशावेळी वन्यजीव विभागाने शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवून सहकार्याने व्यवस्थापन केल्यास पुढील काळात चित्र काही वेगळे होऊ शकते, असे या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे. वाघांच्या संख्येत वाढ होणे, ही अतिशय सकारात्मक आणि पर्यटन वाढीला चालना देणारी बाब आहे. यामुळे पर्यटन आणि रोजगार वाढू शकतो. राखीव नसणाºया जंगलातही वाघाचे वास्तव्य आहे. मात्र या क्षेत्रात वाघाचे संरक्षण गंभीरपणे होत नसल्याचे दिसून येते. या संरक्षणासाठी वनाधिकाºयांना अतिरिक्त मनुष्यबळ अभयारण्यात व या क्षेत्रात उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
जंगलातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज निर्माण झाली आहे. जंगलात पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध राहिले, तर गवत आणि इतर पाला हिरवा राहील. त्यामुळे गवतावर अवलंबून असलेले प्राणी जंगलातून इतरत्र जाणार नाही. बहुतेकवेळी यावर अवलंबून असलेले प्राणी जंगलाच्या बाहेर पडतात. त्यांना खाणारे वाघदेखील या प्राण्यांमागे जंगलाबाहेर पडतात. त्यामुळे जंगलातील नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचे योग्य प्रकारे संवर्धन होणे गरजेचे असताना या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
आंतरराज्यीय शिकाऱ्यांचा अभयारण्यावर डोळा
एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना आंतरराज्यीय शिकारी टोळ्यांच्या नजराही अभरण्यासह असंरक्षित परिसरात असलेल्या वाघावर वळत असल्याचे सांगितले जाते. या शिकाऱ्यांचाही बंदोबस्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरेपूर मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे आहे.