यंदा उत्पन्न घटल्याने वाढली चिंता
By Admin | Updated: October 18, 2014 23:02 IST2014-10-18T23:02:42+5:302014-10-18T23:02:42+5:30
तालुक्यात यावर्षी पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या उशीरा झाल्या़ कमी-अधिक पावसाने नंतर पिके जोमाने आली़ तथापि अचानक पावसाने पिके जोमान असताना एक महिना दडी मारल्याने आणि सोयाबीवर शेंगांवर

यंदा उत्पन्न घटल्याने वाढली चिंता
मारेगाव : तालुक्यात यावर्षी पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या उशीरा झाल्या़ कमी-अधिक पावसाने नंतर पिके जोमाने आली़ तथापि अचानक पावसाने पिके जोमान असताना एक महिना दडी मारल्याने आणि सोयाबीवर शेंगांवर व कपाशी फुलावर असताना पाऊस आल्याने शेंगा तयार झाल्या़, मात्र त्यात दाणाच नाही. कपाशीवर आलेल्या रोगामुळे सोयाबीन व कपाशी उत्पादनात मोठी घट अल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़
खरीप हंगामात सुरूवातीला कमी-अधिक पावसाचा शेती पिकांना फटका बसला़ परंतु नंतरच्या पावसाने पिकांची स्थिती चांगलीच सुधारली़ त्यामुळे शेतकरी सुखावला होता. नंतर पिके हळूहळू वाढत गेली आणि पाऊस गायब झाला़ ऐन सोयाबीन पीक फुलावर असताना त्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने आता चांगल्याप्रकारे सोयाबिनचे पीक हाती लागेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती़ परंतु नंतर पुन्हा महिनाभर पाऊस गायब झाला. तरीही सोयाबिनला शेंगा लागल्या़ मात्र शेंगा पाहिजे तशा भरल्याच नाहीत़ त्यातच सोयाबिनवर पाने खाणाऱ्या लष्करी अळीने आक्रमण केल्याने सोयाबिनचे पिक परिपक्व होण्यापूर्वीच करपून गेले़ त्यामुळे शेतकऱ्यांनी पदरी पडेल तेवढे पीक घरी न्यावे, म्हणून सध्या सोयाबिनची काढणी सुरू केली आहे़ यावर्षी सोयाबीन पिकाचा उतारा अर्ध्यावर आला आहे़ परिणामी सोयाबीन पिकासाठी लावलेला खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत़ सोयाबिनचे दरही यावर्षी कमी असल्याने सोयाबीन विकून आलेला पैसा दिवाळीवर खर्च होणार असल्याने समोर कुटुंब कसे चालवावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
सोयाबिनने दगा दिल्यानंतर आता शेतकऱ्यांची सर्व भीस्त कपाशीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी सीतादही करून कापूस वेचणीला सुरूवात केली आहे. बाजारात काही कापूस विक्रीसाठी येतही आहे. मात्र कपाशी पीक जोमात असताना आणि बोंडे लागण्याच्या काळातच एक महिना पावसाने दडी मारली होती. नंतर विविध रोगांचे आक्रमण झाल्याने आता थोडी फार बोंडेच फुटत आहे़ त्यामुळे पुढील एक-दोन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी होण्याची शक्यता आहे. कपाशीचा उताराही या वर्षी अत्यल्प येण्याची शक््यता असल्याने शेतकऱ्यांना फार मोठे नुकसान सोसावे लागणार आहे़ त्यामुळे हे वर्ष पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी कर्जबाजारीपणाचे ठरण्याची शक्यता आहे़ (शहर प्रतिनिधी)