गंभीर गुन्ह्यांमधील शिक्षेचे प्रमाण वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST2019-11-28T06:00:00+5:302019-11-28T06:00:07+5:30
जिल्हा पोलीस दलाच्या एकूणच कारभाराचे वार्षिक निरीक्षण महानिरीक्षकांच्या चमूद्वारे नुकतेच पार पडले. या अनुषंगाने महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी विविध मुद्यांवर जिल्हा पोलीस दलाला सूचना केल्या. न्यायालयात वर्षभरात हजारो खटले दाखल होतात. त्यापैकी किती गुन्ह्यांमध्ये शिक्षा होते, किती गुन्ह्यातील आरोपी निर्दोष सुटतात आणि या निर्दोषत्वामागील नेमकी कारणे काय याचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे रानडे यांनी सांगितले.

गंभीर गुन्ह्यांमधील शिक्षेचे प्रमाण वाढवा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गुन्हेगारांवर जरब निर्माण व्हावी, गुन्हा करण्याचे धाडस कुणी करू नये म्हणून न्यायालयात दाखल गंभीर गुन्ह्यांच्या खटल्यात शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जावे असे निर्देश अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी दिले आहे.
जिल्हा पोलीस दलाच्या एकूणच कारभाराचे वार्षिक निरीक्षण महानिरीक्षकांच्या चमूद्वारे नुकतेच पार पडले. या अनुषंगाने महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी विविध मुद्यांवर जिल्हा पोलीस दलाला सूचना केल्या. न्यायालयात वर्षभरात हजारो खटले दाखल होतात. त्यापैकी किती गुन्ह्यांमध्ये शिक्षा होते, किती गुन्ह्यातील आरोपी निर्दोष सुटतात आणि या निर्दोषत्वामागील नेमकी कारणे काय याचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे रानडे यांनी सांगितले. पोलीस तपासातील त्रुट्यांमुळे आरोपी सुटत असतील तर या त्रुट्या राहणार नाही, या दृष्टीने खबरदारी घ्यावी, तपास अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, विधी अधिकारी, पैरवी अधिकारी, सरकारी अभियोक्ता यांनी आणखी काळजी घेण्याची आवश्यकता रानडे यांनी व्यक्त केली. मालमत्ता व शरीरासंबंधीचे गुन्हे वाढू नये, त्यासाठी आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या, वाटमारी, जबरी चोरी, दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न या सारख्या गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार, निगरानी बदमाश यांच्यावर पोलिसांनी कायम वॉच ठेवावा, त्यांचा ठावठिकाणा सातत्याने तपासला जावा, अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी पेट्रोलिंग करावी, आरोपी अटक झाल्यास तातडीने त्याच्या कुटुंबियांंना माहिती द्यावी, तपासाबाबत वेळोवेळी वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे, त्यात उणिवा राहत असतील तर त्या दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, अशा सूचना देण्यात आल्या. मटका, जुगार, दारू व अन्य अवैध धंदे बंद केले जावे, पोलीस प्रशासनाने त्याबाबत उपाययोजना कराव्या असेही रानडे यांनी पोलीस प्रशासनाला बजावले. महानिरीक्षकांच्या या वार्षिक निरीक्षणात ४० टक्के रेकॉर्डची तपासणी केली गेली. प्रशासनात सूसुत्रता रहावी, सामाजिक सलोखा कायम रहावा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यावर प्रशासनाने भर देण्याचे सूचविण्यात आले.
वार्षिक निरीक्षणात ‘आलबेल’ दाखविण्याचा प्रयत्न
महानिरीक्षकांचे वार्षिक निरीक्षण होणार असल्याने जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेने सतर्क राहून आलबेल दाखविण्याचा प्रयत्न केला. महानिरीक्षकांनी पाठ फिरविताच अनेक ठिकाणी परिस्थिती जैसे थे झाली. अवैध धंदे पुन्हा रस्त्यावर आले, वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने सर्वच शहरांमध्ये पुन्हा अर्ध्या रस्त्यावर दिसू लागली आहे. वार्षिक निरीक्षणादरम्यान पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी दिलेल्या सूचनांची जिल्हा पोलीस दलात किती पालन होते हे पाहणे महत्वाचे ठरते. सत्र न्यायालय व कनिष्ठ न्यायालयात दाखल खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढविण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.