अवकाळी पावसाने शहरात गारठा अन् शिवारात फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:45 IST2018-12-10T23:44:23+5:302018-12-10T23:45:24+5:30
ढगाळी वातावरण आणि सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शहरवासीयांना प्रचंड गारठ्याचा अनुभव येत आहे. त्याचवेळी शेतशिवारात मात्र हाताशी आलेल्या पिकांना फटका बसला आहे.

अवकाळी पावसाने शहरात गारठा अन् शिवारात फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ढगाळी वातावरण आणि सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शहरवासीयांना प्रचंड गारठ्याचा अनुभव येत आहे. त्याचवेळी शेतशिवारात मात्र हाताशी आलेल्या पिकांना फटका बसला आहे. फुटलेला कापूस पऱ्हाटीवरच भिजला, तर तुरीचा फुलोरा गळून मातीमोल झाला. आता या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा गावपातळीवर पोहोचली आहे.
शनिवारी सायंकाळी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. तर रविवारी सकाळी अल्पशा सरी बरसल्या. त्यानंतर रात्री जोरदार पाऊस झाला.
हवामानात अचानक झालेल्या बदलाने बाष्प घेवून निघालेले वारे जिल्ह्यात सक्रिय झाले आहे. १३ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यानंतर थंडीची लाट पसरण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. अवेळी बरसणारा हा पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरला.
जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र निम्म्यावर आहे. पाच लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. हा कापूस वेचणीला आला आहे. मात्र मजूर न मिळाल्याने शेतशिवार पांढरेशुभ्र आहे. अवकाळी पावसाने या पिकावर पाणी फेरले आहे.
घाटंजी, पांढरकवडा, दारव्हा, कळंबमध्ये बरसला
गत ४८ तासात यवतमाळात सर्वाधिक १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात १० तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. इतर ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने सरासरी २.६७ मिलिमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापक यंत्रणेने केली आहे. बाभूळगावमध्ये ३ मिमी, कळंब २.३३ मिमी, दारव्हा ३ मिमी, केळापूर ३ मिमी, घाटंजी ४ मिमी, राळेगाव २ मिमी, वणी ३ मिमी, मारेगाव २.४० मिमी, झरी २ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.