आॅटोस्वीचमुळे रोहित्र जळण्याच्या घटना
By Admin | Updated: October 22, 2016 01:44 IST2016-10-22T01:44:47+5:302016-10-22T01:44:47+5:30
महावितरणकडून पुरविल्या जाणाऱ्या विजेच्या येण्याचा व जाण्याचा निश्चित वेळ नसल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागावे लागते.

आॅटोस्वीचमुळे रोहित्र जळण्याच्या घटना
महावितरणचा दावा : अखंडित वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहन
यवतमाळ : महावितरणकडून पुरविल्या जाणाऱ्या विजेच्या येण्याचा व जाण्याचा निश्चित वेळ नसल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागावे लागते. हा त्रास टाळण्यासाठी अनेकजण कृषिपंपांनाच आॅटो स्वीच लावतात. परंतु या यंत्रणेमुळे रोहित्रावरील भार वाढून ते जळण्याचे प्रमाण वाढल्याचा दावा महावितरणने केला आहे. अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आॅटो स्वीचचा वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सद्यस्थितीत एक लाखाच्या घरात कृषिपंपधारक शेतकरी आहे. तर राज्यात सुमारे ३९ लाख कृषिपंपधारक आहेत. महावितरणकडून या शेतकऱ्यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा देण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जावून कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी कृषिपंपांनाच आॅटो स्वीच लावले आहे. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते. ही बाब टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना आॅटो स्वीच लावू नये, तसेच काही शेतकऱ्यांनी ते लावले असल्यास काढून टाकण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. यामुळे रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण कमी होईल व शेतकऱ्यांना योग्य दाबाचा अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळेल आणि शेतकऱ्यांना सोयीचे जाईल, असेही वीज कंपनीने म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. जेणेकरून त्यांना त्यांच्या पिकांना नियमितपणे पाणी देता येईल, असे आवाहन वीज कंपनीने केले आहे. (प्रतिनिधी)
वीज बचतीसाठी कपॅसिटर बसवावे
कृषिपंपधारक शेतकऱ्यांनी कृषिपंपाला कपॅसिटर बसवावे. यामुळे वीज बचत होवून पुरेशा दाबाने वीज पुरवठा मिळतो. तसेच कृषिपंप जळण्याचे प्रमाणही कमी होते. रोहित्रांवरील भार ३० टक्क्याने कमी होवून रोहित्र जळण्याचेही प्रमाण कमी होते. या सर्वांचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्यामुळे त्यांनी कपॅसिटरचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही महावितरणने केले आहे.