रस्त्यासाठी बेमुदत उपोषण
By Admin | Updated: December 29, 2014 23:53 IST2014-12-29T23:53:13+5:302014-12-29T23:53:13+5:30
दारव्हा तालुक्यातील लोही येथील गादी पिंजनालयासमोरील रस्ता मोकळा करावा या मागणीसाठी लोही येथील तरुणाने येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ केला आहे.

रस्त्यासाठी बेमुदत उपोषण
लोही येथील युवक : शेजाऱ्याने बंद केला दुकानाचा मार्ग
यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील लोही येथील गादी पिंजनालयासमोरील रस्ता मोकळा करावा या मागणीसाठी लोही येथील तरुणाने येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ केला आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाची दखल मात्र प्रशासनाने घेतली नाही. विशेष म्हणजे याच मागणीसाठी त्याचे हे चौथे उपोषण आहे.
लोही येथील बसस्थानकाजवळ अजीम खान अमीर खान पठाण यांचे गादी पिंजानालयाचे दुकान आहे. या दुकानाच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर मनोज पुंड या तरुणाने लोखंडी टिनपत्र्याचा मोठा खोका आणून ठेवला आहे. त्यामुळे गादी पिंजनालयाकडे जाणारा रस्ता वर्षभरापासून बंद आहे. पठाण यांना यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले असून, कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत त्यांनी ग्रामपंचायतीसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. परंतु पूर्तता झाली नाही. त्यामुळे पठाण यांनी २२ डिसेंबरपासून यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे. परंतु अद्याप कोणीही दखल घेतली नाही. (नगर प्रतिनिधी)