पालिकेकडून अशुद्ध पाण्याचा पुरवठा

By Admin | Updated: November 19, 2016 01:37 IST2016-11-19T01:37:34+5:302016-11-19T01:37:34+5:30

नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहरात होणारा पाणी पुरवठा अशुद्ध स्वरूपात होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

Impure water supply from the school | पालिकेकडून अशुद्ध पाण्याचा पुरवठा

पालिकेकडून अशुद्ध पाण्याचा पुरवठा

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ : जलशुद्धीकरण केंद्र केवळ देखावा
वणी : नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहरात होणारा पाणी पुरवठा अशुद्ध स्वरूपात होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पालिकेकडून चालविले जाणारे जलशुद्धीकरण केंद्र केवळ देखावा बनले आहे. या केंद्राद्वारे पाण्याचे शुद्धीकरण केलेच जात नाही तर नदीतून ओढलेले पाणी केवळ अ‍ॅलम मिसळवून टाकीत भरले जात आहे व तेच अशुद्ध पाणी नळाद्वारे नागरिकांच्या घरी पोहोचत आहे. नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याशी खेळच मांडला आहे, असा आरोप होत आहे. असे असले तरी नागरिकांकडून पाणीकराची वसुली व्याजासह केली जात असल्याने नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाप्रती चिड व्यक्त होत आहे.
शहरातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या दैैनंदिन उपयोगाएवढे पाणी पुरविणे हे नगरपरिषदेचे कर्तव्य आहे. पुरविलेले पाणी नागरिकांच्या आरोग्याला अपायकारकनसावे, हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी पालिका नागरिकांकडून पाणी कराच्या स्वरूपात कर घेते. दोन वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने पाणी कर वाढवून दुप्पट एक हजार ५०० रूपये केला आहे. हा कर वार्षिक न भरता त्याला तिमाहीत रूपांतर करून भरण्याची सक्ती केली. दर तिमाहीच्या कराच्या मागणी सूचना नागरिकापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे नागरिक तिमाही कर भरू शकत नाही. मग नगरपालिका तिमाही पाणीकर न भरणाऱ्या नागरिकांवर व्याजाचा भुर्दंड लावतात. मात्र महिन्यातून काही दिवस पाणी पुरवठा न झाल्यास त्याचा कर कमी केला जात नाही.
पालिकेजवळ २५ वर्षांपूर्वीची लोकसंख्या विचारात घेतलेली पाणी साठव क्षमता आहे. २५ वर्षांत पालिकेने यात वाढ केली नाही. शहरातील ८० टक्के नागरिकांकडे स्वत:ची पाणी व्यवस्था आहे. त्यामुळे नगरपालिकेचे फावले जात आहे. मात्र काही भागात नागरिकांच्या बोअरला क्षारयुक्त पाणी येत असल्याने त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी नळाच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागत आहे. पालिकेने पाण्याचे शुद्धीकरण करून पाण्याचा पुरवठा करणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून नळाला येणाऱ्या पाण्याला दुर्गंधीही येत असल्याचे नागरिक सांगत आहे.
याबाबत जलशुद्धीकरण यंत्रणेकडे चौकशी केली असता, असे कळले की जलशुद्धीकरणासाठी लागणारे ब्लिचिंग व क्लोरीमगॅस याचा पुरवठाच पालिकेकडून जलशुद्धीकरण यंत्रणेला होत नाही. वास्तविकता वर्षभरासाठी लागणारे ब्लिचिंग व क्लोरीन गॅस याचे टेंडर काढून ते संबंधित एजन्सीला देण्यात आले आहे. मात्र या एजन्सीकडून साहित्याचा पुरवठा बंद आहे. मग या साहित्याचे देयक दर महिन्याला कसे काढले जात आहे. हा चिंतनाचा विषय आहे. पाण्याचे शुद्धीकरण करण्याला किमान चार तासाचा वेळ लागतो.
शुद्धीकरण करून टाकी भरण्यास दिवसभरात एकदाच टाकी भरली जावू शकते. मात्र संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी दिवसातून तिनदा टाक्या भराव्या लागतात, असे यंत्रणेकडून समजले. त्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण न करताच नदीच्या ओढलेल्या पाण्यात केवळ अ‍ॅलम मिसळवून पाणी टाकत चढविले जात आहे. नगरपरिषदेच्या या उदासिन धोरणामुळे बहुतांश नागरिकांना घरीच जलशुद्धीकरण यंत्र बसवून घेतले आहे. त्यामुळे नागरिकांवर यंत्र खरेदीचा व विजेचा भुर्दंड बसत आहे. मात्र आरोग्य निरामय राहण्यासाठी नागरिकांना खर्च करून पाणी शुद्ध करावे लागत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Impure water supply from the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.