पोलिस ठाण्यात वाद घालणाऱ्याला कारावास; पोलिस ठाण्यात जावून जोरजोरात आरडाओरडा करणे भोवले
By सुरेंद्र राऊत | Updated: July 10, 2023 19:28 IST2023-07-10T19:28:45+5:302023-07-10T19:28:57+5:30
पोलिस ठाण्यात जावून जोरजोरात आरडाओरडा करणे व शासकीय कामात अडथळा निर्माण करणे एकाला चांगलेच भोवले.

पोलिस ठाण्यात वाद घालणाऱ्याला कारावास; पोलिस ठाण्यात जावून जोरजोरात आरडाओरडा करणे भोवले
यवतमाळ : पोलिस ठाण्यात जावून जोरजोरात आरडाओरडा करणे व शासकीय कामात अडथळा निर्माण करणे एकाला चांगलेच भोवले. अतिरिक्त सत्र न्यायालयाने या गुन्ह्यातील आरोपीला सहा महिने कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली. प्रमोद श्रावणजी राठोड (रा. बाळेगाव, ता. नेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
प्रमोद हा १५ सप्टेंबर रोजी नेर पोलिस ठाण्यात गेला. त्याने तेथे वाद घालत शिपाई नितीन केशव कडूकार याच्यावर हल्ला चढविला. मारहाण करून पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. याप्रकरणी शिपायाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३५३, ३२३ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक विजय गरड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा न्यायाधीश एस. एस. शर्मा यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील उदय पांडे यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. त्यावरून प्रमोद राठोड याला कलम ३५३ अंतर्गत सहा महिने कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली.
सोबतच कलम ३२३ मध्येही सहा महिने कारावास व ५०० रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. या दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्र भोगावयाच्या आहेत. या खटल्यात नेर ठाण्यातील पैरवी सचिन डहाके यांनी सहकार्य केले.