कारागृह कोरोनापासून अभेद्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:01 IST2020-08-26T05:00:00+5:302020-08-26T05:01:05+5:30
कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असताना कारागृह संसर्गापासून सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. येथील जिल्हा कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी संसर्गाचा धोका ओळखून सुरुवातीलाच नव्याने येणाऱ्या बंद्यांसाठी विलगीकरण कक्ष उघडला. यवतमाळातील गोदणी मार्गावर शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या आवारात तात्पुरते कारागृह उघडण्यात आले. विलगीकरण आणि कारागृह अशा स्वरूपात या इमारतीचा वापर करण्यात येऊ लागला.

कारागृह कोरोनापासून अभेद्य
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी कारागृह प्रशासनाने सुरुवातीपासूनच दक्षता घेतली. परिणामी अद्यापपर्यंत जिल्हा कारागृहाची भिंत कोरोना संसर्गाला भेदता आली नाही. तेथील कैदी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित राखण्यात यश मिळाले आहे. विलगीकरणातील दोन कैदी पॉझिटिव्ह आले. मात्र तेही जामिनावर सुटल्यानंतर अहवाल मिळाला.
कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असताना कारागृह संसर्गापासून सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. येथील जिल्हा कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी संसर्गाचा धोका ओळखून सुरुवातीलाच नव्याने येणाऱ्या बंद्यांसाठी विलगीकरण कक्ष उघडला. यवतमाळातील गोदणी मार्गावर शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या आवारात तात्पुरते कारागृह उघडण्यात आले. विलगीकरण आणि कारागृह अशा स्वरूपात या इमारतीचा वापर करण्यात येऊ लागला. २ मे पासून विलगीकरणामध्ये आतापर्यंत ३७० बंदी ठेवण्यात आले होते. त्यापैकी १६० जणांना जामिनीवर सुटका झाली, तर १९० जणांना पूर्ण तपासणी करून कारागृहात ठेवण्यात आले.
इतर कारागृहाची स्थिती पाहता यवतमाळ जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली. कारागृहात नवीन बंद्यांना व कच्च्या कैद्यांना थेट प्रवेश दिला जात नाही. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला किमान १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवले जाते. या कालावधीत त्याची कोरोना तपासणी करून नंतर कारागृहात सोडण्यात येते. विलगीकरण कक्षातील ३७० जणांचे नमूने तपासणीला पाठविले आहे. यातील एक दुर्धर आजाराचा रुग्ण असलेला कैदी वैद्यकीय महाविद्यालयातच उपचारादरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळला, तर विलगीकरण कक्षातील दोघांचे नमूने पॉझिटिव्ह आले. मात्र १७ ऑगस्टला दिलेल्या नमून्यांचा अहवाल २१ ऑगस्टला मिळाला. तोपर्यंत ते दोन कैदी जामीन मंजूर झाल्याने बाहेर सुटले होते. अद्यापही दहा नमुन्यांचा अहवाल आलेला नाही.
कारागृहाच्या विलगीकरण कक्षातील बंद्यांचा कोरोना तपासणी अहवाल तातडीने मिळणे आवश्यक आहे. यासाठी कारागृह अधीक्षकांनी जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्य चिकित्सकांकडे वारंवार पत्रव्यवहारही केला आहे. कारागृहाच्या विलगीकरण कक्षातील बंद्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट किटद्वारे तपासणी केली जावी, जेणेकरून तपासणीचा अहवाल तातडीने मिळतो व वेळीच खबरदारी घेण्यास सोयीचे होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून रॅपिड टेस्ट होत नसल्याने बंद्यांचे नमूने आरटीपीसीआर मशीनवर तपासणीसाठी पाठविले जाते. यात नमून्यांचा अहवाल येण्यासाठी पाच ते सहा दिवस लागतात.
निगेटिव्ह नमुन्यांचे अहवाल मिळतच नसल्याची ओरड
पॉझिटिव्ह असलेल्या बंद्यांचा अहवाल मिळण्यासाठी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागते. निगेटिव्ह असल्याचा अहवाल बऱ्याचदा दिला जात नाही. तपासणी अहवालाला वेळ लागत असल्याने संभ्रमावस्थेत काम करावे लागते.
कारागृहाची सुरक्षितता कायम राखत कोरोना संसर्गापासून वाचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. आरोग्य यंत्रणेकडून आणखी थोडे सहकार्य अपेक्षित आहे. चाचणीचा अहवाल वेळेत मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. - कीर्ती चिंतामणी
कारागृह अधीक्षक, यवतमाळ