शाळेत तंबाखू खाणाऱ्या शिक्षकांवर तत्काळ कारवाई
By Admin | Updated: February 26, 2016 02:15 IST2016-02-26T02:15:11+5:302016-02-26T02:15:11+5:30
तंबाखूचे सेवन हे अनेक दुर्धर आजारांना आमंत्रण देणारे आहे. ही बाब लक्षात घेता शालेय स्तरावरील मुलांच्या मनामध्ये तंबाखूचे दुष्परिणाम बिंबविणे आवश्यक आहे.

शाळेत तंबाखू खाणाऱ्या शिक्षकांवर तत्काळ कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : शाळेजवळील तंबाखू विक्री दुकानांचे परवाने रद्द करणार
यवतमाळ : तंबाखूचे सेवन हे अनेक दुर्धर आजारांना आमंत्रण देणारे आहे. ही बाब लक्षात घेता शालेय स्तरावरील मुलांच्या मनामध्ये तंबाखूचे दुष्परिणाम बिंबविणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळेत तंबाखू सेवन करून येणाऱ्या शिक्षकांवर तत्काळ कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समितीची सभा घेण्यात आली. यावेळी त्यांनी हे आदेश दिले.
बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. राठोड, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त जयंत वाणे, माहिती सहायक गजानन कोटुरवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शाळेच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शाळांना सूचित करण्यात यावे, त्या आशयाचे फलक शाळेत लावण्यात यावे, असे सांगून या परिसरात स्थानिक स्वराज्य संस्थांनी तंबाखू विक्री करणाऱ्या दुकानांना परवाने दिले असले तरी तीन महिन्यांच्या आत या दुकानांचे परवाने रद्द करावेत, असेही आदेश दिले. जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या पानटपऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून छापे घातल्या जात आहेत. त्यासोबतच हे पदार्थ ज्या ठिकाणाहून पुरविल्या जातात, त्यात मोठा साठा बाळगणाऱ्यांवरही कारवाई केल्यास ही साखळी तोडण्यास मदत होईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
तंबाखूजन्य पदार्थांमुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे. कॅन्सर झालेल्या रूग्णांमध्ये तंबाखू हे प्रमुख कारण समोर आले आहे. अल्पावधीत तंबाखूचा परिणाम दिसत नसला, तरी कालांतराने याचे दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३२८ नुसार कारवाई करण्यात यावी. या कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आवश्यक असलेली पदभरतीही तातडीने करावी. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या १० दंत चिकित्सकांच्या मदतीने मार्चपासून १६ तालुक्यांत कॅन्सर आणि दंत चिकित्सा शिबिर आयोजित करावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविले.
कॅन्सर आणि आकस्मिक मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने या क्षेत्रात जबाबदारीने कार्य करण्याची गरज आहे. यामध्ये मानसिक समुपदेशन होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तंबाखूचे सेवन सोडण्याची मानसिक तयारीही होणे गरजेचे आहे. समाजात वातावरण तयार होण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून शालेयस्तरावर निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, दिंडीच्या माध्यमातून समाजात जागृती करावी, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी येत्या काळात मनुष्यबळ वाढवून तंबाखूविरोधी कारवाई वाढवावी, आवश्यकता भासल्यास पोलीस दलातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले. केवळ दंडात्मक कारवाईवर समाधान न मानता फौजदारी कारवाईही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यात टाकलेल्या छाप्यांमध्ये १५ प्रकरणी ३ हजार तर ३५ प्रकरणांत ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले आहे. २५ पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती दिली. (स्थानिक प्रतिनिधी)