भीसीतून लुटलेला पैसा अवैध सावकारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 06:00 AM2019-09-28T06:00:00+5:302019-09-28T06:00:14+5:30

या अवैध सावकारीत अनेक प्रतिष्ठीत, व्हाईट कॉलर व्यक्ती सक्रिय आहेत. त्यांनी स्टँडर्डपद्धतीने अवैध सावकारी चालविली आहे. व्याजाच्या पैशावर त्यांचे सर्व अर्थचक्र चालविले जाते. यातूनच या अवैध सावकारांनी यवतमाळ शहरातच नव्हे तर बाहेर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रियल इस्टेटमध्ये पैसा गुंतविला आहे. शहरातही मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी खरेदी केली गेली.

Illegal money laundering money stolen from VC | भीसीतून लुटलेला पैसा अवैध सावकारीत

भीसीतून लुटलेला पैसा अवैध सावकारीत

googlenewsNext
ठळक मुद्देआवाक्या बाहेरील व्याजदर : सहकार प्रशासन, प्राप्तिकर खात्याला खुले आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ शहरात व्यापाऱ्यांची भीसी बुडवून सुमारे २० कोटी रुपयांची लूट केली गेली असून त्यातील पैसा थेट अवैध सावकारीत वाटण्यात आला आहे. सावकारीतील या पैशावर व्याजाचा दर पाच ते २५ टक्क्यापर्यंत एवढा मनमानी पद्धतीने आकारला गेल्याने ही अवैध सावकारी सहकार प्रशासन आणि प्राप्तीकर खात्यासाठी खुले आव्हान ठरली आहे.
यवतमाळ शहरात भीसीचा खूप मोठा व्यवसाय चालतो. त्याचे निवडक ऑर्गनायझर व डझनावर सब ऑर्गनायझर आहेत. या भीसीची सूत्रे विशिष्ट व्यक्तींच्या हातात आहे. त्यांनी भीसीतील सुमारे २० कोटी रुपयांच्या रकमेचा गौडबंगाल केला आहे. अनेक सबऑर्गनायझरचे पैसे भीसीच्या सूत्रधाराकडे फसले आहे. तर काहींनी हा पैसा आयपीएल क्रिकेट सट्ट्यात प्रमुख बुकींगकडे हारला आहे. भीसीतील हा संपूर्ण पैसा आता अवैध सावकारीत उतरविण्यात आला आहे. पुढच्या व्यक्तीची गरज ओळखून सावकारीतील या पैशाच्या व्याजाचा दर पाच टक्क्यापासून २५ टक्क्यापर्यंत आकारला जातो. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. या पैशाच्या वसुलीसाठी या अवैध सावकारांनी गुंड पोसले आहेत. व्यसनाच्या आहारी गेलेले अनेक शासकीय कर्मचारी या अवैध सावकारांनी कंगाल केले आहेत. या कर्मचाऱ्यांचे बँक एटीएम, पासबुक, चेकबुकसुद्धा सावकारांकडेच असल्याचेही सांगितले जाते. सावकार आपल्या व्याजाच्या पैशाची एटीएमद्वारे परस्परच वसुली करून घेतो.
या अवैध सावकारीत अनेक प्रतिष्ठीत, व्हाईट कॉलर व्यक्ती सक्रिय आहेत. त्यांनी स्टँडर्डपद्धतीने अवैध सावकारी चालविली आहे. व्याजाच्या पैशावर त्यांचे सर्व अर्थचक्र चालविले जाते. यातूनच या अवैध सावकारांनी यवतमाळ शहरातच नव्हे तर बाहेर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रियल इस्टेटमध्ये पैसा गुंतविला आहे. शहरातही मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी खरेदी केली गेली. सावकारीच्या मोठ्या व्यवसायातूनही अनेक महागडी प्रॉपर्टी मजबुरीचा फायदा घेऊन कमी दरात घेतली गेली आहे. भीसी व्यवसाय व अवैध सावकारीआड कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना प्राप्तीकर खाते नेमके आहे कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या व्यवहाराला कुणाचाही लगाम नसल्याने प्राप्तीकर खाते अस्तित्वात आहे की नाही अशी शंकाही बोलून दाखविली जात आहे.
भीसीच्या व्यवसायातील गुंतवणूक बहुतांश ब्लॅकमनी आहे. त्यात फसविले गेलेले आणि फसविणारे दोघेही या व्यवहारात कुठेच रेकॉर्डवर नाहीत. त्यामुळे आपल्या विरोधात कुणी पोलिसात तक्रार करणार नाही असे समजून कोट्यवधींनी फसवणूक करणारे अगदी बिनधास्त दिसत आहेत. तर फसविली गेलेली मंडळी मिळेल तेवढी रक्कम टप्प्याटप्प्याने का होईना काढण्याच्या प्रयत्नात आहे. त्यात यश आले नाही तरच पोलिसात कायद्याच्या चौकटीत बसवून फिर्याद देण्याची व्यूहरचना करण्यात आली आहे. त्यासाठी कमी रकमेची भीसी दाखवून संबंधिताला पोलीस रेकॉर्डवर आणले जाणार आहे.
भीसी व त्यातूनच फोफावलेल्या अवैध सावकारीतील पैशाच्या वसुलीतून गुन्हेगारी वर्तुळाला आर्थिक ‘टॉनिक’ दिले जात आहे. त्यातूनच नवीन गुन्हेगारी टोळ्या, त्याचे सदस्य तयार होत आहेत, लगतच्या भविष्यात या टोळ्यांची संख्या वाढल्यास पोलिसांसाठी डोकेदुखी ठरणार, एवढे निश्चित.

सावकारीतील व्याजापोटी चक्क ले-आऊट घशात घातले
धामणगाव रोडवरील एका व्हॉईट कॉलर व्यक्तीची स्टँडर्ड अवैध सावकारी चालते. काही वर्षांपूर्वी या सावकाराने शहरातील एका सेठला सहा कोटींचे कर्ज दिले होते. गेल्या चार-पाच वर्षात या कर्जावर अव्वाच्या सव्वा व्याज आकारुन सुमारे सात कोटी रुपये वसूलही केले गेल्याचे सांगितले जाते. परंतु मूळ रक्कम कायमच असल्याने त्या बदल्यात चौसाळा रोडवरील एका ले-आऊटचा बहुतांश भाग या अवैध सावकाराने घशात घातला. अलिकडे तर त्या ले-आऊटमधील आणखी काही जमीन सावकाराने घेतल्याचे सांगितले जाते. घरीच थाटलेल्या आलिशान कार्यालयातून या अवैध सावकाराचा कारभार चालविला जातो आहे. ‘लक्झुरीयस लाईफ’ जगणाऱ्या या व्हॉईट कॉलरचा नेमका व्यवसाय कोणता, घराच्या बाहेर न पडताही उत्पन्नाचे साधन काय याचे अनेकांना कोडे आहे. मात्र भीसी प्रकरणानंतर हा व्यक्ती अवैध सावकारीत सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले. या अवैध सावकाराकडील बाथरुममध्ये असलेल्या महागड्या मशीनची चर्चाही सावकारी क्षेत्रातील सदस्यांमध्ये होताना दिसते.

Web Title: Illegal money laundering money stolen from VC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा