आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: January 4, 2015 23:21 IST2015-01-04T23:21:57+5:302015-01-04T23:21:57+5:30
जिल्ह्यातील नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. परिचारिकांना ३० वर्षांची सेवा होऊन १२ वर्षानंतर मिळणाऱ्या कालबद्ध/आश्वासित पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नाही.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष
प्रलंबित मागण्या : सोमवारपासून सुरू होणाऱ्या उपोषण आंदोलनात कर्मचाऱ्यांचा सहभाग
यवतमाळ : जिल्ह्यातील नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. परिचारिकांना ३० वर्षांची सेवा होऊन १२ वर्षानंतर मिळणाऱ्या कालबद्ध/आश्वासित पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नाही. २४ वर्षानंतर मिळणाऱ्या लाभाचा थांगपत्ता नाही. अनेकवेळा आंदोलन झाले, आश्वासने मिळाली. परंतु कारवाई मात्र झाली नसल्याचे राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस अनंत सावळे यांनी म्हटले आहे.
सातत्याने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. अधिकाऱ्यांना मात्र अभय देण्यात येते. एकीकडे कर्मचाऱ्यांना न्याय देताना दिरंगाई होते. परंतु कारवाई करताना मात्र क्षणाचाही विलंब होत नाही. दोन्ही वैद्यकीय अधिकारी गैरहजर असताना प्रसूतीचा रुग्ण हाताळणाऱ्या एलएचव्हीवर निलंबनाची कारवाई होते. १५ दिवसांपूर्वी बदलीने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवर ही कारवाई होते. मुदतबाह्य औषधी सापडली की जबाबदारी कर्मचाऱ्यांचीच, आॅपरेशन थिएटर किंवा बाह्यरुग्ण विभाग सांभाळणारा कर्मचारी एकच नसतो, या बाबत विचार करायला अधिकाऱ्यांना वेळ नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करून तसेच वेळोवेळी निवेदन देऊन आणि आंदोलने करूनसुद्धा वेळोवेळी केवळ आश्वासने देऊन संघटनेची बोळवण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. १ जानेवारीपासून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दहा कर्मचारी बेमुदत उपोषण आंदोलनाला बसले असून या आंदोलनाची दखल न घेतल्यास ५ जानेवारीपासून संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह २१ नर्सेस व आरोग्य कर्मचारी आमरण उपोषण करतील. तसेच या उपोषणाला पाठिंबा म्हणून दोन तालुक्यातील कर्मचारी धरणे देतील. असेसुद्धा सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)