‘स्वाईन फ्लू’साठी जिल्ह्यात हायअलर्ट
By Admin | Updated: February 7, 2015 01:36 IST2015-02-07T01:36:16+5:302015-02-07T01:36:16+5:30
अमरावती या शहरात स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढले असून अनेक रुग्ण पॉझिटीव्ह आढळत आहेत. काहींचा मृत्यू झाल्याच्याही नोंदी आहेत.

‘स्वाईन फ्लू’साठी जिल्ह्यात हायअलर्ट
सुरेंद्र राऊत यवतमाळ
नागपूर, अमरावती या शहरात स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढले असून अनेक रुग्ण पॉझिटीव्ह आढळत आहेत. काहींचा मृत्यू झाल्याच्याही नोंदी आहेत. सुदैवाने यवतमाळ जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा एकही संशयीत आढळला नाही. मात्र खबरदारीची उपाय योजना म्हणून आरोग्य यंत्रणेने स्वाईन फ्ल्यूसाठी हायअर्लट जारी केला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसह जिल्ह्यात १८ ठिकाणी स्क्रिनींग सेंटर तयार करण्यात आले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून जनजागृतीवर भर दिला जात आहे.
यवतमाळात गतवर्षी बाहेर गाववरून आलेल्या स्वाईन फ्ल्यूच्या एका संशयीत रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कुठेही स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण आढळला नाही. यंदाही जिल्ह्यात कुठेही स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण आढळल्याची नोंद नाही. मात्र प्रशासनाने विशेष खबरदारी म्हणून यंत्रणेला सतर्क केले आहे. विषम तापमानामुळे स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अचानक वाढलेली थंडी, ढगाळी वातावरण, त्यानंतर तापमानात झालेली वाढ हा बदल ‘एच-वन’ आणि ‘एन-वन’ या स्वाईन फ्ल्यू विषाणूसाठी पोषक ठरणारा आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातही स्वाईन फ्ल्यूच्या प्रसाराबाबत दक्षता घेतली जात आहे.
सर्दी-पडसा, ताप, अंगदुखी, घशात खवखव अशीच लक्षणे स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये आढळते. त्यामुळे प्रथमदर्शनी हा आजार सहज ओळखता येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेणे रुग्णांमध्ये तीन प्रकारात वर्गीकरण केले आहेत. सी, बी, ए अशी वर्गवारी करून त्या पध्दतीने उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ग्रामीण भागात काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसाठी सुध्दा हा आजार नवीनच आहे. उपचाराच्या अनुषंगाने जागृती केली जात आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी बाहेरगावावरून आलेल्यांची तपासणी केली जात आहे. त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी व्हिडीओ कॉन्फरसींगच्या माध्यातून सर्व आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विषाणूच्या संसर्गाने होणार आजार असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना सुध्दा सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून योग्य साधने पुरविण्यात आली आहेत.
लक्षणांवरून तीन प्रकारात रुग्णांचे वर्गीकरण
रुग्णांचे तीन प्रकारात वर्गीकरण केले आहेत. यात ३८ अंशा खाली ताप, खोकला, अंगदुखणे, सर्दीपडसा, घशात खवखव यांना ‘सी’ प्रकाराता मोडले जाते. अशा रुग्णांना उपचारानंतर २४ तासांनी परत तपासणीसाठी बोलविण्यात येत आहे. प्राथमिक स्वरूपाचा उपचार देऊनही २४ तासांमध्ये रुग्णाचा ताप ३८ अंशापेक्षा वाढल्यानंतर त्याला जवळच्या स्क्रिनींग सेंटरवर पाठविण्यात येणार आहे. येथे त्यांच्या घशातील सॉब घेऊन त्याची तपासणी केली जाणार आहे. हा रुग्ण ‘बी’ प्रकारात मोडतो. रुग्णाच्या सॉब तपासणीत आजार निश्चित झाल्यानंतर त्याला उपजिल्हा रुग्णालया अथवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती केले जाणार आहे. त्यांचा स्वतंत्र कक्षात उपचार करण्याची व्यवस्था केली आहे. असे रुग्ण ‘ए’ प्रकारात मोडतात. उपचाराच्या दृष्टीकोणातून हे वर्गीकरण केले आहे. यावरून उपचाराची दिशा ठरवून संबंधित रुग्णावर योग्य ते उपचार केले जाणार आहे.
मुबंई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर या शहरांना अती जोखीम परिसर म्हणून घोषित केले आहे. येथून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. याशिवाय लक्षणे आढळल्यास प्रत्येकानेच तपासणी करून घेण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात टॉमी फ्ल्यूच्या २० हजार गोळ््यांचा साठा आहे. आरोग्य केंद्रावर तो उपलब्ध आहे.
- डॉ. के.झेड़ राठोड
जिल्हा आरोग्य अधिकारी
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संसर्गजन्य रुग्णांच्या वॉर्डात दोन खोल्या स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णासाठी आराक्षित केले आहेत. महाविद्यालयात स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. रुग्णालयात टॉमी फ्ल्यूचा साठा उपलब्ध आहे. एकंदर तयाराची आढावा घेण्यासाठी सोमवारी बैठक आयोजित केली आहे.
- डॉ. किशोर इंगोले
अधीक्षक वैद्यकीय महाविद्यालय .