कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न, मदतीला धावणाऱ्यावरही हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2022 14:44 IST2022-10-25T14:43:56+5:302022-10-25T14:44:17+5:30
शेंबाळपिंपरी येथील घटना

कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न, मदतीला धावणाऱ्यावरही हल्ला
यवतमाळ : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने कुऱ्हाडीने तिच्यावर हल्ला केला. पत्नीला ठार करण्यासाठी घरात डांबून तिच्यावर घाव घातले. ही घटना पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे घडली. हल्लेखोर पतीने पत्नीला वाचविण्यासाठी पुढे आलेल्या शेजाऱ्यांवरही हल्ला चढविला. झटापट करून त्याने पळ काढला. ही घटना शनिवारी रात्री घडली.
वंदना शेषराव नेवकर (३५) असे जखमी महिलेचे नाव आहे. तिचा पती आरोपी शेषराव सटवा नेवकर (४०) याने कुऱ्हाडीने हल्ला केला. जखमी महिलेला वाचविण्यासाठी शंकर नारायण जटाळे हे पुढे आले असता त्यालाही आरोपीने धमकाविले. आरडाओरडा केल्यानंतर जमाव जमा झाला. त्यावेळी आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
जखमी वंदना बेशुद्ध पडली होती. तिला तत्काळ पुसद उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी शंकर जटाळे यांच्या तक्रारीवरून आरोपी पती शेषराव नेवकर याच्याविरुद्ध कलम ३०७, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.