'ती' प्रियकरासोबत फरार होणाच्या तयारीत, पतीने दोघांना पकडले अन्..
By सुरेंद्र राऊत | Updated: November 13, 2023 18:04 IST2023-11-13T18:04:15+5:302023-11-13T18:04:34+5:30
तलावफैल पंचशीलनगरची घटना : आरोपी पतीला केली अटक

'ती' प्रियकरासोबत फरार होणाच्या तयारीत, पतीने दोघांना पकडले अन्..
यवतमाळ : येथील पंचशीलनगरमध्ये प्रियकरासह पत्नी पळून जाण्याच्या बेतात होती. त्यांच्या मागावर असलेल्या पतीने दोघांना पकडले. तेथे पतीची प्रियकरासोबत झटापट झाली. यात पतीने धारदार चाकूने वार करून प्रियकराला गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजता दरम्यान घडली.
निखील अविनाश मेश्राम (२५) रा. पंचशीलनगर तलावफैल असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याचे बोरगाव डॅम येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेशी सूत जुळले. निखील हा कार वॉशिंग सेंटरवर काम करीत होता. विवाहितेच्या पतीला या संबंधाचा संशय आला. तो दोघांवरही पाळत ठेऊन होता. विवाहिता प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत होती. याच दरम्यान पाळतीवर असलेल्या पतीने दोघांनाही पंचशील नगर परिसरात पकडले. तिथे झटापट झाली. यात चवताळलेल्या पतीने निखीलवर चाकूने वार केले. त्याच्या पोटात चाकूचे घाव लागले. यात तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी शहर पोलिसांनी कलम ३०७ भादंविनुसार गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली. ही कारवाई ठाणेदार सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात अंकुश फेंडर, प्रदीप नाईकवाडे, संतोष व्यास, किरण पघडण, सुनील पैठणे यांनी केली.
शासकीय रुग्णालयातून जीवंत माणसाचा डेथ मेमो
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे. कुणाचाच कुणावर वचक नाही. चाकूहल्ल्यात गंभीर जखमी निखील मेश्राम याच्यावर शस्त्रक्रियागृहात उपचार सुरू असताना दुसरीकडे अपघात कक्षातून मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याने निखील मेश्रामचा मृत्यू झाल्याचा अहवाल (डेथ मेमो) शहर पोलिस ठाण्यात पाठविला. यामुळे एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. निखील मेश्राम जीवंत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे माहीत होताच पुन्हा तो मृत्यू अहवाल बोलविण्यात आला. असा गोंधळ येथे कायम सुरू असतो. याकडे स्थानिक प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. यातून गंभीर घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.