दोन बूट आणि पायमोजे १७० रुपयांत कसे मिळणार ? शाळा व्यवस्थापनासमोर मोठा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 18:28 IST2025-05-09T18:27:28+5:302025-05-09T18:28:52+5:30

शाळा व्यवस्थापन समितीपुढे पेच : एका गणवेशासाठी ३०० रुपये निश्चित

How to get two shoes and socks for Rs 170? A big question before the school management | दोन बूट आणि पायमोजे १७० रुपयांत कसे मिळणार ? शाळा व्यवस्थापनासमोर मोठा प्रश्न

How to get two shoes and socks for Rs 170? A big question before the school management

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
मोफत गणवेश योजनेप्रमाणेच शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना २०२३-२४ पासून दरवर्षी एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे देण्यात येते. त्यासाठी प्रति विद्यार्थी १७० रक्कम निश्चित करण्यात आली आहे. तोकड्या रकमेत बूट व पायमोजे कसे खरेदी करायचे असा प्रश्न शाळा व्यवस्थापन समितीला पडला आहे.


केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले व दारिद्रय रेषेखालील मुलांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो. गणवेश योजनेसाठी प्रति गणवेश ३०० रुपये याप्रमाणे राज्य शासनानेसुद्धा दोन गणवेशासाठी ६०० रुपयांची रक्कम निश्चित केली आहे. गणवेशाचा लाभशाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमी रक्कमेत बूट, पायमोजे खरेदी करण्यासाठी मुख्याध्यापकांसह शाळा व्यवस्थापन समितीला दुकानदारांकडे पायपीट करावी लागणार आहे. शासनाने वाढत्या महागाईचा विचार करून गणवेश व बुटाच्या रकमेत वाढ करण्याची मागणी केली जात आहे. 


यंदा तरी शाळेच्या पहिल्या ठोक्याला मिळणार का?

  • गेल्या वर्षी कसेबसे बूट व पायमोजे खरेदी करून विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले. मात्र, गणवेश वितरणात मोठा गोंधळ निर्माण झाला. पहिल्या गणवेशाचे वितरण दिवाळीपर्यंत चालले.
  • स्काऊट गाईडचा गणवेशही उशिरा मिळाला होता. नवीन शैक्षणिक सत्रात वेळेवर गणवेश देण्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, वेळेवर वितरण होणार की नाही, हे आत्ताच सांगता येत नाही.
  • मोफत गणवेश, बूट व पाठ्यपुस्तके मिळत असल्याने विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत उत्स्फूर्त हजेरी लावतात. मात्र नियोजनाप्रमाणे गणवेश व बूट मिळत नाही.


माप कधी घेतले?
गणवेशासाठी शालेय सत्र सुरू असताना मार्च महिन्यातच विद्यार्थ्यांचे माप घेण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळांना देण्यात आले होते. त्यानुसार बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांचे गणवेशासाठी माप घेतले असून, कापड खरेदी करून अथवा रेडिमेड गणवेश खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.


जिल्ह्यात एक लाख ७५ हजार विद्यार्थी
जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीचे जिल्ह्यात जवळपास एक लाख ७५ हजारच्या घरात लाभार्थी विद्यार्थी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळतो.


गेल्या वर्षी असा झाला होता गणवेशात गोंधळ?
मागील वर्षी बचत गटामार्फत शिलाई करून विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्याचा निर्णय दिला होता. मात्र, विद्यार्थ्यांचे माप चुकले होते. अनेक विद्यार्थ्यांच्या अंगात गणवेश जात नव्हता. कुठे जास्त तर कुठे कमी, असे वितरण करण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. सगळीकडून संताप व्यक्त झाल्याने अखेर पुन्हा गणवेश खरेदीची धुरा शाळा व्यवस्थापन समितीच्या खांद्यावर देण्यात आली.

Web Title: How to get two shoes and socks for Rs 170? A big question before the school management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.