यवतमाळातील मालखेड-सिंदखेड शिवारात एकूण किती वाघ ? २० जनांवरांवर हल्ले केल्याने दशहत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 20:11 IST2025-12-16T20:06:32+5:302025-12-16T20:11:31+5:30
वनविभाग अलर्ट मोडवर : २० जनांवरांवर हल्ले केल्याने दशहत, ट्रॅप कॅमेऱ्यात एक वाघ कैद, आणखी वाघ

How many tigers are there in total in Malkhed-Sindkhed Shivara in Yavatmal? attacked 20 cattles
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तालुक्यातील मालखेड-सिंदखेड शेतशिवारात वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात एक वाघ ट्रॅप झाला आहे. मात्र परिसरात सुरू असलेल्या हालचालींवरून येथे एकापेक्षा अधिक वाघ असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांत धास्तीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाची यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून वन्यजीव संरक्षक पथकाने जंगलात तंबू ठोकला आहे. मागील काही दिवसांत वाघाच्या हल्ल्यात परिसरातील २० जनावरे जखमी झाली तर काही ठार झाल्याची नोंद आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सिंदखेड व मालखेड शेत शिवारात तसेच मांगलादेवी येथेही वाघाचे दर्शन अनेकांना झाले होते. मात्र, तो वाघ की बिबट याबाबत स्पष्टता आली नव्हती. या वाघाने आतापर्यंत २० जनावरावर हल्ले केले आहेत. तर काही जनावरांचा जीवही घेतला आहे. अखेर याबाबत तक्रारी वाढत असताना वन विभागाच्या कॅमेरात हा वाघ टिपल्या गेला आहे. वाघच असल्याची खात्री वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष लंबे यांनी दिली.
वनविभागाच्या वन्यजीव पथकाने या शेतशिवारात वाघाचा बंदोबस्त लावण्यासाठी तंबू ठोकला आहे. भारतीय वनसेवा अधिकारी भुवनेश्वर बाबू नारा व वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष लंबे यांनी जंगलाची पाहणी करून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या परिसरात एकापेक्षा जास्त वाघ असण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे. त्यासाठी कृती समिती तयार केली आहे.
शिंदखेड ते खुटाफळी मार्गावर आधीही रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना बिबट्या दिसून आला होता. काही दिवसांपूर्वी शिंदखेडकडे जात असताना एका वाहनासमोर बिबट्या आडवा आल्याने अपघाताची स्थिती निर्माण झाली होती. परिस्थितीची गांभीर्यता लक्षात घेऊन शिंदखेड येथील मिलन राठोड यांनी नेर वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
सिदखेड, खुटाफळीचे ग्रामस्थ 'सातच्या आत घरात'
नेर तालुक्यातील सिदखेड, खुटाफळी परिसरातील शेतशिवारात गेल्या काही दिवसांपासून दोन ते तीन बिबट्यांचा मुक्त वावर आहे. त्यामुळे शेतकरी व गावकऱ्यांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोजच जनावरांवर हल्ले होत असल्याने सायंकाळचे सात वाजले की हा रस्ता बिबट्याच्या धास्तीने शांत होतो. अनेकजण सायंकाळी सात नंतर गावात जाण्याऐवजी इतरत्र मुक्काम ठोकतात. धास्तीचे हे वातावरण पाहता वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातून होत आहे. कापूस वेचणीच्या मोसमाला सुरुवात झाल्याने शेतात जाणाऱ्या मजुरांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. दिवसाढवळ्या बिबट्या दिसत आहे. त्यामुळे शिवारातील कामे अडथळ्यात आली आहेत.
"मालखेड सिंदखेड शेत शिवारादरम्यान वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद झाला आहे. या जंगलात एकापेक्षा जास्त वाघ आहेत का याची खात्री केल्या जात आहे. वन विभाग वाघाचा बंदोबस्त लावण्यासाठी प्रयत्न करत असून नागरिकांनी सावध राहावे. "
- सुभाष लंबे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नेर