५० हजारात शेततळे खोदायचे कसे ?
By Admin | Updated: February 29, 2016 01:54 IST2016-02-29T01:54:57+5:302016-02-29T01:54:57+5:30
शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना आणली आहे.

५० हजारात शेततळे खोदायचे कसे ?
शेतकऱ्यांचा सवाल : यवतमाळ जिल्ह्यात साडेतीन हजार
यवतमाळ : शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना आणली आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात तब्बल ५१ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दीष्ट ठेवले गेले असले तरी ५० हजारात शेततळे खोदायचे कसे हा शेतकऱ्यांचा शासनाला सवाल आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शेततळे योजनेची घोषणा केली होती. नियोजन विभागाने १७ फेब्रुवारी रोजी त्या संबंधीचा आदेश जारी केला. २३ फेब्रुवारीपासून ‘आपले सरकार’ या शासकीय पोर्टलवर शेततळ्यांसाठी अर्ज डाऊनलोड करणे सुरू झाले. २९ फेब्रुवारीपर्यंत ते डाऊनलोड करता येतील. त्यानंतर हे अर्ज त्याच वेबसाईडवर अपलोड करायचे आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यात सन २०१६-१७ मध्ये ५१ हजार ५०० शेततळे खोदण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यात एकट्या अमरावती विभागात १३ हजार २१५ शेततळे खोदले जाणार असून यातील सर्वाधिक तीन हजार ४४३ शेततळे एकट्या शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात देण्यात आले आहे. प्रत्येक शेततळ्यासाठी शासन ५० हजार रुपये देणार असून मशीनने हे शेततळे खोदले जाणार आहे. सात प्रकारच्या आकारमानाचे शेततळे यात आहेत. सर्वात मोठे ३० बाय ३० आणि तीन मीटर खोल आकाराचे शेततळे असून सर्वात लहान १५ बाय १५ व तीन मीटर खोलीचे शेततळे आहे. शेतकऱ्याला शेततळे मंजूर झाल्यानंतर त्याला स्वत: आधी पैसा गुंतवून हे शेततळे तयार करायचे आहेत. त्यानंतर त्याच्या खात्यात आकारमानानुसार अनुदान जमा केले जाणार आहे. परंतु ५० हजारात शेततळे होणार कसे असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
आघाडी सरकारचीच योजना
हीच शेततळ्यांची योजना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये राबविली गेली होती. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, फलोत्पादन अभियान अंतर्गत राबविल्या गेलेल्या या योजनेत सव्वा लाख रुपये अनुदान दिले जायचे. परंतु भाजपा-शिवसेना युती सरकारने हीच योजना नाव बदलवून आणली असून त्याचा खर्च मात्र अर्ध्यावर आणला आहे.
आधी खर्च, नंतर देयक मिळणार
विदर्भातील शेतकरी आधीच दुष्काळाचा सामना करतो आहे. ५० पैशापेक्षा कमी आणेवारी येऊनही त्याला दुष्काळी मदत अद्याप मिळाली नाही. आर्थिक संकटात असलेला शेतकरी शेततळ्यासाठी ५० हजार आणणार कोठून ही मुख्य अडचण आहे. त्याने व्याजाने पैसे आणल्यास पैसे नेमके किती दिवसात खात्यात जमा होणार याची हमी नाही. शेततळ्यामध्ये जागा जात असल्याने शेतकऱ्यांची आधीच त्यासाठी मानसिकता नाही.
शेतकऱ्यांचा कल विहिरींकडे
विदर्भात अनेक ठिकाणी तीन फुटाखाली मुरुम असल्याने मोठ्या आकाराचे शेततळे खोदायचे असेल तर २ बाय १० चा पोकलॅन्ड लागतो. जेसीबीने तो खोदला जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही योजना कुचकामी ठरत आहे. ते पाहता पाचशेही तळे होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांचा ४५ हजार मशीनने विहीर खोदण्याकडे अधिक कल असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)
सामूहिक शेततळ्यातही जाचक अटी
शासनाने पश्चिम महाराष्ट्रात सामूहिक शेततळे योजना राबविली. मात्र त्यात परिसरातील २५ हेक्टर क्षेत्रात फळबाग व भाजीपाला लागवड ही अट आहे. विदर्भात असे क्षेत्र मिळणे कठीण आहे. ही अट शिथील केल्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळू शकतो.