घराला लागली आग; वृद्धेचा संसार खाक
By Admin | Updated: April 26, 2015 00:02 IST2015-04-26T00:02:13+5:302015-04-26T00:02:13+5:30
तालुक्यातील नवरगाव येथे शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घरातील फ्रिजने पेट घेतल्याने आग लागली.

घराला लागली आग; वृद्धेचा संसार खाक
शॉटसर्किट : किराणा दुकान, आटा चक्की, रोख दीड लाख रूपये, धान्य झाले भस्मसात
मारेगाव : तालुक्यातील नवरगाव येथे शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घरातील फ्रिजने पेट घेतल्याने आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून तानेबाई जगन्नाथ आवारी या ७२ वर्षीय वृद्ध महिलेचा संसार खाक झाला.
या आगीत रोख दीड लाख रूपये, लगतच्या किराणा दुकानातील सर्व साहित्य, आटा चक्की, घरातील धान्य, जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. यासोबतच घरातील १२ तोळे सोने गायब असल्याची माहिती तानेबाई यांनी दिली. तानेबाई या ७२ वर्षीय वृद्ध महिलेचे नवरगाव येथे किराणा दुकान, आटा चक्की, थंड पेयाचे दुकान आहे. त्यांचा मुलगा गावातच दुसरीकडे राहतो. त्यांची शेती धरणात गेल्यामुळे उपजीविकेसाठी वृद्ध तानेबाईने हा व्यवसाय सुरू केला. त्यांचे घर जुन्या काळातील असून लाकडाच्या पाट्यांची लादणी आहे.
शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या घरातील फ्रीज जळायला सुरूवात झाली. फ्रीज जळत असल्याचा वास आल्याने आणि बघता-बघता घराला आग लागल्याने म्हातारी ओरडत घराच्या बाहेर पडली. शेजाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीने उग्ररूप धारण केले होते. आग आटोक्यात येत नसल्याने तत्काळ पोलीस व महसूल विभागाला माहिती देण्यात आली. मारेगाव पोलिसांनी तत्काळ वणी व पांढरकवडा येथील अग्नीशमन दलाला माहिती देऊन बंब पाठविण्याची मागणी केली व घटनास्थळ गाठले.
ग्रामस्थांच्या मदतीने आग गावात पसरणार नाही, यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. वणी येथील अग्नीशमन दलाचे वाहन आल्यानंतर आग आटोक्यात आली. तानेबाई यांच्या घराला लाकडाचा वापर जादा असल्याने तोपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झाले. घरातील एकही वस्तू बाहेर काढता आली नाही. या आगीत किराणा दुकानातील संपूर्ण साहित्य, धान्य, संसारोपयोगी वस्तू, आटा चक्की जळून खाक झाली.
विहिरीचे बांधकाम करण्यासाठी बँकेतून काढून आणलेले दीड लाख रूपये आणि १२ तोळे सोनेही आगीत भस्मसात झाल्याची माहिती तानेबाईचा मुलगा रामकिसन आवारी यांनी दिली. संपूर्ण आयुष्याची कमाई बेचिराख झाल्याचे बघून वृद्ध तानेबाई धाय मोकलून रडत होती. घटनास्थळी तहसीलदार डॉ.संतोष येवलीकर, ठाणेदार उमेश पाटील, महसूल व पोलीस विभागाची चमू तळ ठोकून होते. वृत्तलिहिस्तोवर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असल्याने नेमका नुकसानीचा आकडा कळू शकला नाही. (शहर प्रतिनिधी)
रस्त्यांची दुरवस्था
पांढरकवडा : तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहे. अनेक मार्गांवर खड्डे असल्याने दररोज किरकोळ अपघातही घडत आहेत.
पांढरकवडा अग्निशमन दलाची असमर्थता
आगीचे वृत्त कळताच ठाणेदार उमेश पाटील यांनी पांढरकवडा येथील अग्निशमन दलाला गाडी पाठविण्याची विनंती केली. मात्र तेथील अग्निशमन विभागाने गाडी पाठविण्यास असमर्थता दाखविली. आमच्याकडे गाडी आहे, पाणीही आहे, मात्र चालकच नसल्याचे त्यांनी सांगितले. आग लागल्यानंतर चालकाविना अग्निशमन दलाच्या गाड्या उभ्या राहात असेल, तर शासन जनतेच्या पैशातून लाखो रूपये खर्च करून कशाला गाड्या खरेदी करतात, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत होते. वरिष्ठांनी याची दखल घेऊन सखोल दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.
ग्रामस्थांच्या एकोप्याने मोठा अनर्थ टळला
वणीवरून अग्निशमन दलाची गाडी गावात पोहोचेपर्यंत आग गावात पसरणार नाही, यासाठी गावकऱ्यांनी मिळेल तेथून पाणी आणून एकोप्याने आगीवर नियंत्रण ठेवले होते. तानेबाई आवारी यांचे घर मध्यवस्तीत असल्याने आगीवर नियंत्रण ठेवले नसते, तर संपूर्ण गाव आगीच्या विळख्यात सापडण्याची शक्यता बळावली होती. मात्र ग्रामस्थांनी एकजुटीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला शेवटी ‘गाव करी, ते राव न करी’, या सुभाषीताचा गावकऱ्यांनी प्रयत्य आणून दिला.