वसतिगृहाची इमारत जीर्ण
By Admin | Updated: August 15, 2015 02:30 IST2015-08-15T02:30:50+5:302015-08-15T02:30:50+5:30
आदिवासी मुलींच्या वसतिगृहाची इमारत जीर्ण झाली असून या इमारतीत वास्तव्यास असलेल्या ७५ आदिवासी मुलींचा जीव धोक्यात आला आहे. ...

वसतिगृहाची इमारत जीर्ण
अविनाश खंदारे उमरखेड
आदिवासी मुलींच्या वसतिगृहाची इमारत जीर्ण झाली असून या इमारतीत वास्तव्यास असलेल्या ७५ आदिवासी मुलींचा जीव धोक्यात आला आहे. या जीर्ण इमारतीत दुर्गंधीही पसरली असून आदिवासी विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने पालकांत प्रचंड रोष दिसत आहे.
उमरखेड येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी मुलींसाठी वसतिगृह निर्माण करण्यात आले. त्यावेळी एक इमारत भाड्याने घेऊन त्यात वसतिगृह थाटण्यात आले. परंतु त्या ठिकाणी मुलींना त्रास होत असल्याने व इमारत जीर्ण झाल्याने पुसद मार्गावरील कृष्णानगरीत एका जुन्या इमारतीत नव्याने वसतिगृह सुरू केले. सदर वसतिगृह तीन वर्षांपासून या इमारतीत सुरू आहे. जीर्ण इमारतीची आजपर्यंत कोणतीही डागडुजी करण्यात आली नाही. अशा स्थितीत या ठिकाणी ७५ मुली राहतात. त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
मुलींच्या खोल्यांमध्ये स्लॅबमधून पाणी गळते. इमारतीला तडे गेले आहेत. शौचालयाचीही प्रचंड दुरवस्था झाली असून सहा पैकी काही शौचालय बंद आहे. मुलींच्या तपासणीसाठी डॉक्टर येथे येत नाही. त्यामुळे मुलींना खासगी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावे लागतात. त्याच प्रमाणे शैक्षणिक साहित्य, रजिस्टर, पुस्तके मिळाले नाही. गत मार्च महिन्यापासून आजपर्यंत या मुलींना निर्वाह भत्ता आणि प्रसाधन भत्ता मिळाला नाही. या संदर्भात मुलींच्या पालकांनी अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. जीर्ण झालेल्या इमारतीचा करारनामा ३१ मे २०१५ ला संपलेला आहे. त्यामुळे इमारत मालक या खोल्यांची दुरुस्ती करीत नाही. त्याचा फटका मात्र आदिवासी मुलींना बसत आहे. जीव मुठीत घेऊन या विद्यार्थिनी येथे राहतात. या मुलींच्या प्रश्नांबाबत कोणत्याही सामाजिक संघटनेने आजपर्यंत आवाज उठविला नाही. याबाबत अनेक पालकांनी पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे संपर्क केला. परंतु या वसतिगृहाच्या दयनीय अवस्थेत कोणतीच सुधारणा झाली नाही.