शिक्षकांच्या सन्मानात पटसंख्येची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:14 IST2017-09-05T23:14:41+5:302017-09-05T23:14:56+5:30
उल्लेखनीय कार्य करणाºया शिक्षकांना मंगळवारी जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्यात जिल्हा परिषद सदस्य व अध्यक्षांनी जिल्हा परिषद शाळेतील रोडावत चाललेली पटसंख्या, अस्वच्छतेवर चिंता व्यक्त केली.

शिक्षकांच्या सन्मानात पटसंख्येची चिंता
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उल्लेखनीय कार्य करणाºया शिक्षकांना मंगळवारी जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्यात जिल्हा परिषद सदस्य व अध्यक्षांनी जिल्हा परिषद शाळेतील रोडावत चाललेली पटसंख्या, अस्वच्छतेवर चिंता व्यक्त केली. शिक्षकांनी काळानुरूप अध्यापनात बदल करून जिल्हा परिषदेच्या शाळांना पुन्हा ‘अच्छे दिन’ आणावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी अनिल आडे होत्या. सदस्य स्वाती येंडे, रेणूताई शिंदे, चितांगराव कदम, राम देवसरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक सिंगला, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी आदी उपस्थित होते. यावेळी राम देवसरकर, चितांगराव कदम यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांची विदारक स्थिती सर्वांपुढे मांडली. एखाद्या अभियंत्याने चूक केली, तर त्याचे परिणाम समाजातील विशिष्ट वर्गाला भोगावे लागतात. मात्र शिक्षकाने चूक केली, तर त्याचे परिणाम संपूर्ण समाजावर होतात. त्यामुळे शिक्षकांनी आपल्या कामाशी प्रामाणिक राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. जिल्हा परिषदेच्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेत मागे पडलेल्या आहेत. पूर्वी सारखा आता शिक्षकांचा गावकºयांशी संवाद नसतो, अशी खंत व्यक्त करीत चिंतागराव कदम यांनी शाळेमध्ये शिक्षकांनी गतिमानता, पारदर्शकता आणि आकर्षकता ही त्रिसूत्री अमलात आणली पाहिजे, असे आवाहन केले. सीईओ दीपक सिंगला शिक्षकांची बाजू सावरत म्हणाले, जिल्ह्यातील ९५ टक्के शिक्षक चांगले काम करीत आहेत. ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांनी उरलेल्या ५ टक्के शिक्षकांना चांगले करण्याचा प्रयत्न करावा. चितांगराव कदम साहेब एक महाविद्यालय चालवितात, त्यातच किती त्रास होतो, याचा अनुभव त्यांना आहे. मग लाखो शाळा चालविताना शासनाला किती त्रास होत असेल, असा टोलाही सीईओंनी लगावला. संचालन चंद्रबोधी घायवटे यांनी केले.
पदाधिकाºयांचा अघोषित बहिष्कार
कार्यकमाला अध्यक्ष वगळता इतर एकही पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यांनी एकप्रकारे अघोषित बहिष्कार टाकल्याचे यावरून दिसून आले. विशेष म्हणजे खुद्द शिक्षण सभापतींनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवून एका शिबिराला जाणे पसंत केले. त्यामुळे उपस्थितांमध्ये कुजबूज सुरू होती. पदाधिकाºयांचे अंतर्गत मतभेद असल्यामुळेच हा प्रकार घडल्याची चर्चा होती. तथापि वर्षातून एकदाच शिक्षकांचा गौरव होतो. त्यामुळे इतर पदाधिकाºयांनी किमान हा एक दिवस आमचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रमाला यायला हवे होते, असे मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केले. यातच दोन्ही शिक्षणाधिकाºयांना कोपºयात बसविल्यामुळेही शिक्षकांमध्ये नाराजी दिसून येत होते.
पुरस्कार प्राप्त शिक्षक
आसाराम चव्हाण (केळझरा, आर्णी), विजय वाघ (सावरगाव, कळंब), राजकुमार बारहाते (राळेगाव), संजय चचाणे (राजुरा इजारा वणी), गजानन पुलकुंटवार (करंजखेड महागाव), रामकिशन भोसले (चातारी उमरखेड), नथ्थू चौधरी (पिसगाव मारेगाव), कैलास चव्हाण (घोडदरा पांढरकवडा), आरती गुंडावार (हरसूल दिग्रस), गणपत गाऊत्रे (पार्डी जांब घाटंजी), सुरेश कुलरकर (मालखेड खुर्द नेर), लोकेंद्रनाथ खडसे (मांगली झरी), देवराव चव्हाण (दहेली दारव्हा), हंसराज बनसोड (देवगाव बाभूळगाव), सरिता क्षीरसागर (निंबी पुसद), मिना सांगळे (मंगरुळ यवतमाळ), अण्णाराव बोलेवार (पांढरकवडा).
एका तीन अपत्य असणाºया शिक्षकाचे पुरस्कार यादीत नाव होते. अपात्र शिक्षकांना पुरस्कार देण्यात येत असल्याने या कार्यक्रमावर अघोषित बहिष्कार टाकला.
- नंदिनी दरणे
सभापती, शिक्षण व आरोग्य