सहकारी संस्थांना घरघर
By Admin | Updated: May 29, 2014 02:56 IST2014-05-29T02:56:03+5:302014-05-29T02:56:03+5:30
एकमेका सहाय्य करुअवघे धरू सुपंथ’ या न्यायाने सहकारातून समृद्धीचे स्वप्न पाहत

सहकारी संस्थांना घरघर
पुसद : ‘एकमेका सहाय्य करुअवघे धरू सुपंथ’ या न्यायाने सहकारातून समृद्धीचे स्वप्न पाहत पुसद उपविभागात विविध सहकारी संस्था उभारल्या. तत्कालीन नेते मंडळींनी यासाठी मोठे परिश्रम घेतले. यातून या संस्था नावारुपास आल्यात. मात्र काही काळानंतर सहकार चळवळ मंदावली. सहकारी संस्था म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण अशी काहींची समजूत झाली आणि त्यातच सहकारी चळवळ डबघाईस आली. पुसद परिसरातील साखर कारखाना, दूध उत्पादक सहकारी संस्था, सहकारी जिनिंग प्रेसिंग, सूतगिरणीवर अवकळा आली आहे. एकंदरित पुसद परिसरातील सहकारी संस्थांना जणू ग्रहणच लागले आहे. ‘ब्र’ शब्दही काढत नाही. तसेच कामगारसुद्धा शांत असल्या कारणाने सूतगिरणीचा विषयही शांत आहे. शेतकर्यांच्या समृद्धीसाठी जुन्या पुसद उपविभागांतर्गत महागाव तालुक्यातील गुंज येथे पुष्पावंती सहकारी साखर कारखान्याची स्थापना माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या पुढाकाराने करण्यात आली. काही वर्ष हा कारखाना सुस्थितीत चालल्यानंतर कारखान्याला अखेरची घरघर लागली. यातून कारखाना अवसायनात निघाला. कारखान्यावर जप्ती आली. मात्र जागृत शेतकर्यांनी जप्ती हाणून पाडली. कारखाना चालवायचा. शेतकरी जगवायचा. यामुळे नाईलाजाने मग कारखान्याला भाडे तत्वावर द्यावे लागले. यासाठी या भागातील नेते मंडळींनी परिश्रम घेतले असते तर कारखान्यावर भाडे तत्वावर जाण्याची पाळीच आली नसती. यासोबतच पुसद तालुक्यात दुधाच्या माध्यमातून शेतकर्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध करुन देण्यासाठी दूध उत्पादक सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली. एमआयडीसी परिसरात हजारो लिटर क्षमतेचा दूध शीतकरण केंद्र असताना व शेकडो लिटर दूध उत्पादन होऊनही आज या संस्था बंद पडल्या आहेत. कारण काय तर संस्थातील गैरप्रकारामुळे लोकांचा विश्वासच राहिला नाही. त्यामुळे कमी भावात का होईना दूध उत्पादक दूध खासगी व्यापार्यांना देत आहे. तालुक्यातील मोजक्या दूध उत्पादक संस्था तग धरून आहे. पुसद शहरातील यवतमाळ जिल्हा सहकारी कापड सूतगिरणी बारा वर्षांंपासून बंद आहे. जवळपास १२00 च्यावर कामगारांचे संसार उघड्यावर पडले. ही सूतगिरणी राजकीय मंडळींच्या भ्रष्ट कारभाराची बळी पडली. नंतरच्या काळात सूतगिरणी सुरू करण्याचा प्रयत्न झाला असला तरी राजकीय इच्छा शक्तीच्या अभावामुळे ही सूतगिरणी आता तर कायमस्वरुपी काळाच्या आड गेली आहे. कोणताही राजकीय पक्ष याबाबत पुसद तालुक्यातील सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थाही बंद पडल्या आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांच्या पुढाकाराने जिनिंग प्रेसिंगची निर्मिती करण्यात आली हाती. १९९५ पासून या संस्थेला उतरती कळा लागली आणि शेवटी सहा-सात वर्षांंंपासून जिनिंगने अखेरचा श्वास घेतला. या अधोगतीच्या विषयाचा विचार केला तर कुणीही या संस्थेकडे गंभीरतेने पाहिले नसल्याचे दिसून येते. शहरातील सहकारी जिनिंग प्रेसिंगची विस्तीर्ण जागेवर मोटर, रॉड, बेअरिंग व इतर चिल्लर साहित्यावर कुणाचे लक्ष नाही. सहकारी जिनिंगचे आवार क्रीडांगण झाले आहे. एकंदरित पुसद परिसरातील सहकारी चळवळ अखेरच्या घटका मोजत असून काही संस्था कायमस्वरुपी झोपल्या आहेत. या सहकारी चळवळीत नवसंजीवनी देणारा प्रभावशाली नेतृत्व मिळाले तर पुन्हा एकदा सहकार चळवळ जोमाने उभी राहू शकते आणि शेतकर्यांचा विकास होऊ शकतो. मात्र गरज आहे ती सर्व शक्तीने एक होण्याची. (तालुका प्रतिनिधी)